अंतरवाली सराटी (जालना)- राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांना कोण आरक्षण देऊ देत नाही? मराठा आरक्षण न देण्याचं कारण काय? मराठा आरक्षणासाठी आजपासून आमरण उपोषण करण्यात येत आहे. मराठा आंदोलकांनी शांततेनं आंदोलन करावे. आम्ही मराठा आरक्षणाशिवाय थांबणार नाही. ११ दिवस जास्तीचे देऊनही सरकारकडून कोणतीही हालचाल नाही. मराठ्यांवर अन्याय होऊ नये, म्हणून आंदोलन करत आहे. आरक्षणाबाबत सरकार निरुत्साही आहे. मुख्यमंत्र्यांचा आदर, पण सन्मानाचे काय? त्यांनी आरक्षणाचा शब्द खरा करून दाखवावा. एकदा उपोषण सुरू झाले तर राजकीय नेत्यांशी चर्चा करणार नसल्याचंही त्यांनी बोलून दाखविलं आहे.
झारीतील शुक्राचार्य कोण?-राज्य सरकारला विनंती करूनही आरक्षणासाठी काही केलं नाही. सरकार मराठा आरक्षणासाठी गांभीर्य नाही. कुणबी शब्दाची लाज वाटत असेल तर शेतीवर पाय ठेवू नका. आज ४१ वा दिवस असून सरकार काय करतय? मराठा आरक्षणासाठी मोदींनी सरकारला फक्त एक फोन करावा. त्यांनी एक फोन केला तरी आरक्षण मिळते. मुख्यमंत्र्यांना आरक्षणापासून अडविणारे झारीतील शुक्राचार्य कोण? असा प्रश्नदेखील जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. ही नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावीत, असे आवाहनदेखील त्यांनी केले. आरक्षणाला कुणाचा विरोध याचा शोध घेतला जाणार आहे. सरकारमध्ये काहीतरी शिजतयं, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात आरक्षणाकरिता शिवरायांची शपथ घेतली, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
अनेक गावामध्ये नेत्यांना प्रवेशबंदी- भाजपा नेते गिरीश महाजन यांनी फोनवरून मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आंदोलक जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. त्यांनी महाजन यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती फेटाळली आहे. उपोषणाचा निर्णय मागे घणार नसल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितल्याचं सूत्राने माहिती दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता राज्यातील अनेक गावांत नेत्यांना गावबंदी जाहीर करण्यात आली आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण नाही, तोपर्यंत नेत्यांना गावात प्रवेश नाही, अशी मराठवाड्यासह जालना जिल्ह्याती शेकडो गावातील ग्रामस्थांनी निर्णय घेतला.
हेही वाचा-