जालना - वन आणि सामाजिक वनीकरण विभागाचे औरंगाबाद विभागाचे मुख्य वनसंरक्षक पी.के. महाजन यांच्या संकल्पनेतून सन २०१९ मध्ये घन-वन हा नैसर्गिक वनाप्रमाणे वन तयार करण्याच्या या प्रयोगाला सुरुवात झाली. महाराष्ट्रातला पहिला प्रयोग म्हणून जालन्यात सुरुवातीला फक्त २६४ चौरस मीटरवर हा प्रयोग करण्यात आला. हा प्रकल्प यशस्वी होताना दिसत असल्यामुळे आता ४.६६ हेक्टरवर एक लाख ३९ हजार रोपांची घन-वन पद्धतीने लागवड करून नैसर्गिक वन उभे करण्याचा प्रयत्न सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने होत आहे. सध्यातरी गेल्यावर्षीचा प्रयोग पाहता हा घन-वन प्रकल्प यशस्वी होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. सध्या जालना दक्षिणचे सहाय्यक वनसंरक्षक बी. के. पांडे आणि जालना पूर्वाच्या सामाजिक वनीकरणच्या वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली तांबे या कामावर लक्ष देत आहेत.
नैसर्गिक वनांप्रमाणेच झाडे लावून पुन्हा एक जंगल, वन तयार करण्याचा हा एक प्रयोग आहे. हे काम दोन टप्प्यांमध्ये केले जाते. पहिल्या टप्प्यात रोपवनांच्या जागेत लागवड करायची रोपे ठेवली जातात. त्यानंतर त्यांच्या उंचीनुसार वेगवेगळ्या प्रजातींच्या रोपांचा गट करून लागवड केली जाते. दुसऱ्या टप्प्यामध्ये ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे या रोपांची लागवड केली जाते. त्यामध्ये ते किती खोल खड्ड्यात रोपे लावावीत, त्यांच्यामधील अंतर किती असावे, हे खड्डे किती बुजवावेत या बाबींचा समावेश आहे. या प्रयोगात एका चौरस मीटरमध्ये तीन वेगवेगळ्या प्रजातींची झाडे लावली जातात. अशाप्रकारचा हा प्रकल्प सहा ठिकाणी राबविला जात आहे.
झाडांच्या मुळाशी ओलावा धरावा म्हणून मल्चिंगचा ही वापर केला जातो, यामुळे जमिनीची धूप बंद होऊन ओलावा टिकून राहतो आणि कमी पाणी लागते. अशा प्रकारचा हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग आहे. या प्रयोगामध्ये सर्व प्रकारची झाडे लावली जातात. पशु पक्ष्यांना खाद्य मिळेल, धार्मिक आधाराची झाडे, फुलपाखरांना बागडण्यासाठी फुलांची झाडे, औषधी वनस्पती अशा विविध प्रकारच्या वृक्षांचा या घन वन प्रकल्पात वापर केला जात आहे.
आठ महिन्यांपूर्वी लावलेल्या रोप आज अत्यंत चांगल्या परिस्थितीत आहे. या रोपांची वाढही मोठ्या प्रमाणात झालेली दिसत आहे. त्यामुळे मुख्य वनसंरक्षक महाजन यांच्या संकल्पनेला यश आले आहे.