जालना- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापकीय कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, त्यांच्या खुनात सहभागी असलेली संघटना व सूत्रधारांना अद्याप अटक झालेली नाही. त्यांना अटक करावी या मागणीसाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या जालना शाखेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
डॉ. दाभोलकर यांचा २० ऑगस्ट २०१३ ला खून झाला होता. या घटनेला आज ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. दाभोलकर यांच्यानंतर डावे विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ.एम.एम. कलबुर्गी हे महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचे होते, तर विवेकी पत्रकार गौरी लंकेश, अशा सर्व पुरोगामी विचारवंतांची हत्या झाली. या सर्वांच्या हत्येमध्ये साम्य आहे. केंद्रीय व राज्य तपास यंत्रणेत सुसंवाद असावा व खुनात सहभागी संघटना आणि त्यांच्या सूत्रधाराना अटक करावी. हिंसक सनातनी लोक व संघटनांवर बंदी आणावी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी कठोर व कडक कायदा करावा, अशा ४ मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्व शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या घरी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन केले. सदर निवेदन हे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना ई-मेल करण्यात आले असून निवेदनावर जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, जिल्हा प्रधान सचिव मधुकर गायकवाड, जेष्ठ मार्गदर्शक प्रा. बसवराज कोरे, शंकर बोर्डे, प्रशांत वाघ, मनोहर सरोदे, नारायण माहोरे, अनुराधा हेरकर, अनिता माहोरे, निकिता अंबट, गणेश गव्हाणे, विष्णू पिवळसह इतर पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये विविध घोषणा देऊन मारेकऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा- जालना जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील पोलीस हवालदाराला 'राष्ट्रपती पदक'