जालना- सप्टेंबर २०१७ ला अचानक गायब झालेल्या व्यक्तीला शोधून त्याची तब्बल तीन वर्षांनी घरवापसी करण्यात जालना पोलिसांना यश आले आहे. तीन वर्षांपूर्वी नोकरीसाठी औरंगाबादला जातो. असे सांगून गेलेल्या विवाहित पुरुषाने आपले नाव बदलून नागपुरात 'लिव इन रिलेशनशिप'मध्ये राहत कुटुंबीयांशी संपर्क तोडला होता. मात्र, परिवाराच्या आणि पोलिसांच्या आशावादाने त्याचा शोध घेऊन मन वळवण्यात यश आल्याने त्याची पुन्हा कुटुंबाशी भेट घडून आली आहे.
काय आहे प्रकरण?
शहरातील एका नामांकित नेत्रालयामध्ये 2017ला नागपूर येथील एका तरुणीने आपल्या वडिलांना नेत्र शस्त्रक्रियेसाठी आणले होते. त्यावेळी तेथे कार्यरत असलेल्या लक्ष्मण सटवाजी अवधूत (33), रा.मोदीखाना याची त्या मुलीसोबत ओळख झाली. मुलगी परत गावी गेल्यानंतर पुढील आठ दिवस त्यांचे बोलणे सुरू होते. लक्ष्मण याने सप्टेंबर 2017मध्ये पत्नीला माबाईलवरून संपर्क करत नोकरीसाठी औरंगाबादेत जात असल्याचे सांगून घर सोडले आणि तो मोबाईल कायमचा बंद केला. दोन दिवस वाट पाहिल्यावर घरच्यांनी पोलीस ठाणे गाठून हरवल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी देखील पारंपरिक तपास करत शेवटी पुराव्याअभावी प्रकरण बंद केले. मात्र, लक्ष्मण अवधूतचे दोन भाऊ व त्यांचा परिवार, आई, वडील, पत्नी आणि लहान मुलगी लक्ष्मणची वाट पाहत घरी थांबले होते. तीन वर्षांनंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठत पुन्हा पोलिसात तक्रार दाखल करण्याचे ठरवले.
कसा लागला तपास?
पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी नवीन तक्रार न घेता जुन्याच तक्रारीवर तपास करण्याचे ठरविले. त्यांना पोलीस कर्मचारी परशुराम पवार यांनीही साथ दिली. पोलिसांनी पुन्हा तपास यंत्रणा सक्रिय करत लक्ष्मणचा माग काढला. मात्र, त्याने कोणताही पुरावा पाठीमागे न ठेवल्याने तपासात अडचणी येत होत्या. मात्र, पवार यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून 2017मध्ये लक्ष्मण ज्या मित्रांसोबत बोलत होता त्यांच्याशी संपर्क करत लक्ष्मणचा जुना मोबाईल नंबर मिळवला. या नंबरवर संपर्क केला असता, लक्ष्मणने मी लक्ष्मण नाही, विश्वास यादव आहे, असे सांगत पुन्हा फोन केला तर पोलिसात तक्रार देऊ, अशी धमकी दिली. या नंबरबाबत अधिक तपास करीत असताना पवार यांनी लक्ष्मण अवधूत कुणासोबत राहतो, याचा तपास केला. या तपासात लक्ष्मण अवधूत हा नागपूर येथे एका तरुणीसोबत नाव बदलून "लिव्ह इन रिलेशनमध्ये" राहत असल्याचे समजले. ती मुलगी हीच होती जिच्याशी जालन्यातील नेत्रालयात भेट झाली होती. त्यावेळी लक्ष्मणने मला कोणीही नातेवाईक नाही, असे सांगितले होते. म्हणून त्याच्य़ावर विश्वास ठेवत तिने त्याच्यासोबत राहण्यास संमती दर्शवली. पोलिसांनी तिला वास्तवाची जाणीव करून दिल्यावर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले.
दरम्यान, पोलीस आपल्यापर्यंत पोहोचले आहेत, हे लक्षात आल्यानंतर लक्ष्मणने जालन्याला येण्याची तयारी दर्शविली. आणि लक्ष्मण करत घरी आला. त्यानंतर आनंदित झालेल्या त्याच्या परिवाराने पोलीस ठाण्यात येऊन सर्वांना पेढे वाटले आणि पोलिसांचे आभारही मानले. पोलीस निरीक्षक संजय देशमुख आणि परशुराम पवार यांच्यामुळेच लक्ष्मण घरी आला आहे, असे उद्गार लक्ष्मणच्या आईने काढले आहेत. दरम्यान, उद्ध्वस्त झालेल्या एका परिवाराला पुन्हा एकत्र आणण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या लांब हाताचा वापर केल्यामुळे कौतूक होत आहे.