जालना - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना देण्यात येणाऱ्या सकाळच्या आहारामध्ये जीवंत अळी सापडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काल शनिवारी पोह्यामधून कचरा देण्याचा प्रकार येथे घडला होता. तर आजच्या या प्रकारामुळे येथील रुग्णांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या घटनेची मिळालेली माहिती अशी, की जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू असलेल्या परिचर्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना आज रविवारी सकाळी नऊ वाजता दोन अंजीर, चार बदाम आणि उपमा असा नाश्ता देण्यात आला. या अंजिरामध्ये चक्क जीवंत आळ्या फिरताना दिसत आहेत. त्यामुळे हा आहार या रुग्णांसाठी बरा करणार आहे का जीव घेणार आहे, हा प्रश्न या रुग्णांनी उपस्थित केला आहे. तसेच आरोग्यमंत्र्यांनी स्वत:च्या जिल्ह्यात असणाऱ्या रुग्णालयाकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा रुग्णांमध्ये सुरू आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचे सांगितले. तर नवीनच आलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमती भोसले यांनी मी नवीन आहे माहिती घेऊन, कारवाई करते असे सांगितले. यामुळे जालना जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांना प्रशासनाने वाऱ्यावर सोडले असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.