जालना - जाणीव अस्मितेची साहित्य परिषद मराठवाडा, यांच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार प्राध्यापक जयराम खेडेकर यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती या परिषदेचे पदाधिकारी राम गायकवाड यांनी दिली आहे.
जुन्या जालन्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कवितेतील समग्र योगदानासाठी जयस्वाल सोशल फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. रोख रक्कम 25 हजार रुपये, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पूरस्कार सोहळ्यानंतर इंदर बोराडे (पाटोदा), संध्या रंगारी (नांदेड), आशा डांगे (औरंगाबाद), विनायक पवार (रायगड), कैलास भाले (जालना), वामनराव पाटील (परभणी), एकनाथ पांडवे (औरंगाबाद), शिवाजी सातपुते (मंगळवेढा) यांची काव्यमैफल ही आयोजित करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील शिवणीसारख्या डोंगराळ भागातून आलेल्या प्रा. खेडेकर यांच्या कवितांना कृषी संस्कृतीचा संदर्भ असतो. शहरात सांस्कृतिक-साहित्यिक कार्यक्रमांच्या आयोजनात पुढाकार घेणाऱ्यांमध्ये प्रा. जयराम खेडेकर यांचे नाव आघाडीवर असते. कवी असलेले प्रा. खेडेकर इतर साहित्यिकांना पुरस्कारांनी गौरविण्यातही आघाडीवर असतात. त्यांच्या ‘मेघवृष्टी’ काव्यसंग्रहास राज्य सरकारचा बालकवी साहित्य पुरस्कार मिळाला आहे. ‘ऋतुवंत’ हा त्यांचा आणखी एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. ‘ऋतुवंत’ काव्यसंग्रहास शिवार प्रतिष्ठानचा ‘संत जनाबाई पुरस्कार’ मिळाला. अनेक व्यासपीठांवरून काव्यवाचन करणारे प्रा. खेडेकर ‘ऊर्मी’ या नावाचे साहित्यविषयक द्वैमासिकही प्रकाशित करतात. साहित्यविषयक चळवळही चालवितात.