लातूर - हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या कुटूंबावर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, जलकोटच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अशा शेकडो कुटूंबीयांना मदतीचा हात दिलाय. जलकोट पोलिसांनी या कुटूंबांना स्वखर्चातून पंधरा दिवसांचा किराणामाल भरून दिला आहे.
लॉकडाऊनमुळे मजूरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अनेक जणांनी आपल्या गावाचा रस्ता धरला. तर बऱ्याच ठिकाणी वाहतुकीची सोय नसल्या ने या कामगारांना अडकून पडावे लागले. रोजंदारीवर काम करत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलीय. अशातच पोलीस यंत्रणेने दिलेल्या मदतीने या कुटूंबांना दिलासा मिळाला आहे.
अनेक ठिकाणी प्रशासन कामगारांना मदत पोहोचवत आहे. काही ठिकाणी नागरिक देखील धाऊन आले आहेत. मात्र, लातूरमध्ये पोलिसांनी केलेल्या या समाजसेवेचे कौतुक होत आहे.