जालना - शहरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या नागरिकांचा बेशिस्तपणा लक्षात घेऊन प्रशासनाने आता शेवटचा पर्याय म्हणून रविवारी मध्यरात्रीनंतर दहा दिवसांसाठी 'कर्फ्यू' लावण्याचे ठरविले आहे. दहा दिवसात पूर्वीपेक्षाही कडक कारवाई करण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात एक विशेष बैठक पार पडली.
बैठकीला पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, नोडल ऑफिसर डॉ. कडले, आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्यासह जालना नगरपालिकेच्या नगरसेवकांची उपस्थिती होती.
आतापर्यंत लागू असलेला जनता कर्फ्यू आणि त्यामध्ये नागरिकांना मिळालेली सूट यामुळेच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने आता कुठलीही दयामाया न दाखवता कडक कारवाई करत हा कर्फ्यू लागू करावा असे सर्वानुमते ठरले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी रविवारी मध्यरात्रीपासून दहा दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केल्याचे सांगितले आहे.
जालना शहरात सहा एप्रिल रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने आता शेवटचा पर्याय म्हणून रविवार मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच जनता कर्फ्यू लावण्याचे ठरविले आहे.
नगरसेवकांनी केलेल्या सूचना -
- बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची तपासणी करावी.
- औषधे दुकानांना ठरावीक वेळ द्यावी
- ज्याचे घर मोठे आहे त्याने स्वतःहून किंवा प्रशासनाने त्या व्यक्तीला त्याच्या घरातच क्वारंटाईन करावे.
- पूर्वीप्रमाणेच पेट्रोल पंप बंद करावेत जेणेकरून वाहनधारक रस्त्यावर येणार नाहीत.
- नवीन मोंढ्यातील भाजीपाला मार्केट बंद करावे.
- घरपोच औषधे मिळावी यासाठी उपाययोजना करावी.
- बसस्थानक ते भोकरदन नाका परिसरात मोकाट फिरणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करावा.
- उद्योगधंदे बंद असल्यामुळे भाजीपाल्यांच्या गाड्यांची संख्या वाढली आहे ती नियंत्रित करावी.
जिल्हाधिकारी म्हणाले, एका व्यक्तीचा तपासण्यासाठी खासगी रुग्णालयात अडीच हजार रुपये खर्च येतो तर सरकारी यंत्रणेला सोळाशे रुपये खर्च करावे लागतात. हे दोन्ही पर्याय प्रत्यक्षात शक्य होत नाहीत. आणि खर्चिकही आहेत त्यामुळे ज्यांना ही लक्षणे आढळतात अशांची तपासणी केल्या जाईल. यापेक्षा जास्त एखाद्याला त्रास होत असेल तर त्याने स्वतःहून पुढे येऊन आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.