जालना - मंठा तालुक्यातील वाटूर तांडा या ग्रामीण भागात असलेल्या गावाविषयी ईटीव्ही भारतने 9 जुलैला विशेष बातमी प्रसिद्ध केली होती. या गावातील ग्रामस्थांच्या समस्या उजेडात आणून ग्रामसेवक आणि सरपंच यांनी विकासकामात केलेला हलगर्जीपणा उजेडात आणला होता. याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी 23 जुलैला वाटूर तांडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एस. एस. जाधव यांना निलंबित केले आहे.
वाटूर तांडा येथील ग्रामस्थांना 14 व्या वित्त आयोगातून लाख रुपये आलेले असतानाही पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते. त्यातच जलवाहिनीसाठी खोदून ठेवलेले खड्डेही बुजविण्यात आले नव्हते. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता गावकऱ्यांनी वर्तविली होती. यासंदर्भात गावकऱ्यांनी ईटीव्हीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून हा प्रकार दाखविला होता. त्यानुसार 9 जुलैला ईटीव्हीने गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
गावाकडे ग्रामसेवक फिरकलेच नाहीत -
वृत्ताची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी मंठा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर. ए. पारधे यांना गावात जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अधिकाऱ्याने केलेल्या पंचनाम्यात असे लक्षात आले की ग्रामसेवक हे पदभार घेतल्यापासून गावात आलेच नाहीत. याप्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर ग्रामसेवकांनी सादर केलेली कारणे हे योग्य नसल्याचा अहवाल मंठा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना दिला आहे.
ही आहेत निलंबनाची कारणे -
मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी ग्रामसेवक जाधव यांना निलंबित केले. कोरोनाच्या काळात मुख्यालयी वास्तव्य करून न राहणे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये आवश्यक त्या उपाययोजना न करणे, अशी कारणे निलंबनाच्या आदेशात दिले आहेत. याचबरोबर ग्रामपंचायतीला दिलेल्या वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण न करणे व गावातील पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने सदरची दुरुस्ती न करणे, गावकर्यांना पाण्यासाठी भटकंती करायला लावणे या कारणांचाही निलंबनाच्या आदेशात समावेश आहे. सहा महिन्यापासून गैरहजर राहणे व पाणीपुरवठ्यासाठी झालेल्या प्राप्त निधीचा अपहार करणे असा ठपकाही संबंधित ग्रामसेवकावर ठेवण्यात आला आहे.
निलंबित कालावधीमध्ये ग्रामसेवक जाधव यांना मुख्यालय जालना पंचायत समितीत सेवेसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.