जालना - नगरपालिकेसह काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या अकरा नगरपालिकांना मागील आठ महिन्यांपासून नगर विकास खात्याकडून एक रुपया देखील मिळाली नाही. त्यामुळे या नगरपालिकांवर ताबा असलेले काँग्रेसचे अकरा आमदार नाराज असल्याचे जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले आहे. एक प्रकारे सत्तेत वाटा असलेल्या काँग्रेसला गोरंट्याल यांनी घरचा आहेर दिला आहे.
स्वच्छ भारत योजनेअंतर्गत जालना नगरपालिकेला देश पातळीवर 22 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. या क्रमांकाने समाधान झाले नाही, असे सांगत असतानाच यापेक्षाही चांगले काम झाले असते. मात्र, सरकारमधून नगर विकास खात्याने गेल्या आठ महिन्यांपासून जालना नगरपालिकेला एक दमडीही दिली नाही, असा आरोप जालना नगरपालिकेच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांचे पती आणि कथा जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे.
हेही वाचा - चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' वक्तव्यावर विधानसभा अध्यक्षांची प्रतिक्रिया, म्हणाले सभागृहात आल्यावर...
दिनांक 27 मार्च रोजी शासनाने एक अध्यादेश काढून 29 कोटी रुपये नगरपालिकेला आणि सात कोटी रुपये नगरपंचायतीला देण्यात आले असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दोनच दिवसात हा अध्यादेश रद्द केला गेला आणि पैसे काढून घेतले. तसेच काढलेल्या पैशाची काय विल्हेवाट लावली, हे काही त्यांनी कळवले नाही. मात्र, आमच्या नावावर निघालेला हा निधी आम्हाला मिळालाच पाहिजे, अशी मागणीही गोरंट्याल यांनी केली आहे.
तसेच लोकसंख्येच्या आधारावर वाटप होणारा निधी घनसांगी नगरपंचायतीला जास्त मिळतो आणि जालना नगरपालिकेला मिळतच नाही, असा सवतीमत्सर देखील शासन करत असल्याचे आमदार गोरंट्याल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.