जालना - शहरापासूनच आठ किलोमीटरवर शासनाच्या मालकीचा आणि नगरपालिकेचा ताबा असलेला संत गाडगेबाबा जलाशय आहे. हा जलाशय सध्या पूर्ण क्षमतेने भरून वाहात आहे. त्यामुळे पुढील दीड वर्षापर्यंत तरी जालनेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. सध्या या तलावाची दहा हजार एमएलडीची असलेली क्षमता पूर्ण झालेली आहे.
हा घाणेवाडी जलाशय निजामकालीन असून त्यात कोणताही विद्युत पंप नसताना उतारामुळे हे पाणी जालन्याकडे झेपावते आणि जालन्यात आल्यानंतर त्याचे जलशुद्धीकरण केंद्रातून वितरण होते. दररोज या तलावातून सहा एमएलडी पाण्याचा उपसा होतो. हे पाणी टप्प्याटप्प्याने नवीन जालना भागातील दीड लाख लोकांना 22 हजार जोडणींच्या माध्यमातून पुरविले जाते. जालना नगरपालिकेच्या पाणीपुरवठा सभापती पूनम राज स्वामी यांनीही पुढील दीड ते दोन वर्षे हा जलसाठा पुरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. ही जालनेकरांसाठी आनंदाची बातमी असल्याचे त्या म्हणाल्या.
या जलाशयातून फक्त नवीन जालनेकरांना पाणी मिळते. पंधरा वर्षांपूर्वी नवीन आणि जुना जालना अशा दोन्ही भागांसाठी या जलाशयातील पाण्याचा वापर केला जात असे. मात्र, आता जुन्या जालन्यासाठी जायकवाडी धरणातून तर, नवीन जालन्यासाठी पालिकेच्या या संत गाडगेबाबा जलाशयातून पाणीपुरवठा होत आहे. असे असले तरीही जालना शहराला आजही आठ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात आहे.
हेही वाचा - जालना : जायकवाडीच्या डाव्या कालव्यावरील ५० वर्षे जुना पूल कोसळला
हा तलाव सध्या पूर्ण भरलेला असल्यामुळे परिसर हिरवाईने नटलेला आहे. विरंगुळा म्हणून इथे येणाऱ्या जालनेकरांची संख्या वाढली आहे. तलावात असलेल्या विहिरीवर जाऊन पाणी पाहण्याचा आनंद हे नागरिक लुटत होते. यामधून दुर्घटना घडण्याची शक्यताही वाढली होती. त्यामुळे नगरपालिकेने या विहिरीपर्यंत जाण्याचा मार्ग बंद केला आहे. या तलावाच्या काठावर रविवारी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी दोन वेळा लाठ्यांचा प्रसाद देऊन लोकांना पांगवलेही आहे.
हेही वाचा - राज्यभरात राबवण्यात येणारा लिक्विड ऑक्सिजनचा 'जालना पॅटर्न' म्हणजे नेमकं काय, जाणून घ्या