जालना : जालना जिल्ह्यात अंगाचा थरकाप उडावा अशी घटना समोर आलीय. चोर समजून जमावाने तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत सिद्धार्थ मांदळे या तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी चार जणांविरोधात २७ ऑगस्टला खुनाचा गुन्हा दाखल केला.
गैरसमजुतीतून मोटारसायकल बदलली : या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, बदनापूर तालुक्यातल्या दरेगाव शिवारात ड्रायपोर्टनजीकच्या ढाब्यावर २६ ऑगस्ट रोजी सांयकाळी सिद्धार्थ मांदळे हा तरुण मित्रांसह जेवायला गेला होता. जेवण आटपून परत निघताना तो चुकून त्याच्या मोटारसायकलऐवजी तशीच दिसणारी दुसरी मोटारसायकल घेऊन गेला. विशेष म्हणजे त्याच्याजवळच्या किल्लीने मोटर सायकल सुरू झाली. त्यामुळे आपण भलत्याच व्यक्तीची मोटरसायकल घेऊन निघालोय, हे त्याच्या लक्षात आलं नाही. मात्र हे लक्षात येताच, तो मोटरसायकल परत करण्यासाठी माघारी फिरला.
विनवणी करत असल्याचा ऑडिओ समोर आला : दरम्यान, मोटरसायकलचा मालक ५ ते ६ जणांसह सिद्धार्थचा पाठलाग करत आला. या जमावाने सिद्धार्थला भिलपूरी गावाजवळील खाणीजवळ गाठून बेदम मारहाण केली. सिद्धार्थ हा मोटरसायकल चुकून बदलल्याचं सांगत राहिला. मात्र कुणीही त्याचं ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हतं. जीवाच्या आकांतानं तो सैरावैरा पळत होता. तरीही जमावाने त्याला मारहाण करणं थांबवलं नाही. या दरम्यान, त्या तरुणानं आपल्या नातेवाईकांना सेलफोनवरून कॉल केला. 'तुम्ही मला मदत करा, मला वाचवा, हे लोक मला मारहाण करतायत', अशी विनवणी करत असल्याचा त्याचा ऑडिओ समोर आलाय. मात्र, नातेवाईक तिथे पोहोचेपर्यंत सिद्धार्थचा मृत्यू झाला.
चारही आरोपींना अटक : या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात किरण सिध्दार्थ मांदळे रा. भिलपुरी यांच्या फिर्यादीवरून गणेश कैलास जाधव, आकाश अशोक जाधव, तुळशीराम गायकवाड, कुंडलिक भगवान तिरूखे, सर्व रा. दरेगाव यांच्याविरुद्ध हत्येच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय. या चारही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना सोमवारी (२८ ऑगस्ट) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
हे ही वाचा :