जालना - पत्ते खेळण्याच्या ठिकाणाची पोलिसांना माहिती दिल्यावरून आज सकाळी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. सकाळी दहाच्या दरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात दहशत पसरली आहे. हाणामारी दरम्यान तलवारीचाही वापर करण्यात आला. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
घाणेवाडी येथे राहणारे लहू शंकर पवार आज सकाळी त्यांच्या घरासमोर काही सहकाऱ्यांसह गप्पा मारत उभे होते. यावेळी या प्रकरणातील आरोपी दिपक रतन कावळे त्या ठिकाणी आला. यानंतर त्याने लहू पवार यांना मारहाण केली. तसेच पत्ते खेळत असल्याबद्दल पोलिसांना माहिती का दिली, असे म्हणून लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली. याचवेळी दीपक कावळेसोबत आलेल्या नितीन सुरेश कावळे याने तलवारीने लहू पवार यांच्या छातीवर वार करून त्यांना जखमी केले. याप्रकरणी लहू पवार यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वरील दोन आरोपींसह संभाजी शिवाजी कावळे, सोपान राधाकिसन कावळे, उद्धव सुभाष कावळे, काकासाहेब शिवाजी कावळे व इतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, घाणेवाडी शिवारातील शेतांमध्ये अनेक दिवसांपासून पत्त्याचे डाव सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. धक्कादायक म्हणजे यामध्ये पोलीस कर्मचारीदेखील सहभागी होते. त्यामुळे आत्तापर्यंत तक्रार दिल्यानंतरही पोलीस कारवाई करत नव्हते. मात्र, लहू पवार यांनी पोलिसांना या पत्त्याचा डावाबद्दल माहिती दिल्याच्या संशयावरून या दोन गटात हाणामारी झाल्याची चर्चा आहे.