जालना - भोकरदन येथील तहसीलदार संतोष गोरड यांच्याकडे आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एकूण २३ हजार १०० रुपयांचा धनादेश जमा करण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधान परिषदचे आमदार म्हणून शपथ घेतली. याचा आनंद फटाके फोडून, बॅनर लावून न साजरा करता कोरोना महामारी विरोधात लढण्यासाठी महाराष्ट्र सरकारला मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती परिवाराचे अध्यक्ष महेश पुरोहित यांनी ११ हजार रुपये, शिवसेना शहरप्रमुख भूषण शर्मा यांची कन्या धनश्री भूषण हिने साठवलेल्या पैशांमधील ११ हजार रुपये आणि गणपती सर्व्हिसिंग सेंटरचे मालक विनोद शिरोळे यांनी १ हजार १०० रुपये असा एकूण २३ हजार १०० रुपयांचा धनादेश देण्यात आला.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नेतृत्वात या कोरोना संकटाशी लढत आहे. त्यासाठी प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकांनी राज्याला उभारी देण्यासाठी आपले छोटे-मोठे योगदान द्यावे. वेळ प्रसंगी गरज भासल्यास मी माझी एक किडनी गरजवंताला देऊन त्यातून मिळालेली रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देईन, असे यावेळी बोलताना महेश पुरोहित म्हणाले.