जालना : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आज जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये आरक्षण बचाव सभेचं आयोजन करण्यात आलंय. जालना जिल्ह्यातील अंबड येथे आरक्षण बचाव एल्गार सभेला सामाजिक न्याय मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती राहणार आहे. तसंच महादेव जानकर, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, जयदत्त क्षीरसागर आदी ओबीसी नेते देखील उपस्थित राहणार आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये यासह अन्य मागण्यांसाठी ही महासभा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटीपासून अवघ्या 20 किमी अंतरावर ही जाहीर सभा होणार आहे.
- ओबीसींचा अंबडमध्ये एल्गार : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देऊ नये, जातीच्या आधारे जगणना करण्यात यावी, या मागणीसाठी अंबड येथे आज ओबीसी एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेसाठी एकशे दहा एकर जागेवर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या सभेसाठी एक लाख ओबीसी बांधव येण्याची शक्यता आहे. ओबीसी हा मोठा वर्ग आहे. आपण या समाजाच्या हक्कांचं रक्षण केलं पाहिजे. समाजाच्या हक्कासाठी 'मी' सभेला जात आहे. इतरांचे हक्क कोणी हिरावून घेऊ नये. संविधानाच्या संरक्षणाचं कवचं कोणीही मोडण्याचा प्रयत्न करू नये, असं विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटंलय.
राज्यसह केंद्र सरकारला इशारा : या सभेसाठी ओबीसी बांधव जालन्यात दाखल होत आहेत. सरकारनं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावं, अशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करत असल्याचं ओबीसी नेत्यांनी सांगितंलय.आरक्षण आमच्या हक्काचं आहे. त्यात इतर कोणाचाही समावेश करता कामा नये, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं झाल्यास त्यांना वेगळ आरक्षण देण्याची मागणी ओबीसी नेत्यांनी केलीय. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास ओबीसी समाजातील 360 जातींच्या जीवांचं बलिदान देण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. इतर समाजाला आरक्षण द्या, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका, असं म्हणत ओबीसी बांधव एकत्र येत आहेत.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त : सभेच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून ठिकठिकाणी चहा, नाष्टा, फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी मराठा आरक्षणाच्या विरोधाबाबत छगन भुजबळ काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सभेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, म्हणून एसआरपीएफ, रॅपिड ऍक्शन फोर्स दलालाही पाचारण करण्यात आलं आहे.
हेही वाचा -