जालना- आज राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. जालना जिल्ह्यात एकूण 779 ग्रामपंचायत आहेत, त्यापैकी 446 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्याने त्यासाठी आज मतदान पार पडत आहेत. मतदानादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नसून, मतदान शांततेत सुरू असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे.
28 ग्रामपंचायत बिनविरोध
जिल्ह्यात 475 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार होती, मात्र एका ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द झाली, तर 28 ग्रामपंचायतींमधील सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आज उर्वरित 446 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. जालना तालुक्यातील 4, बदनापूर तालुक्यातील 6, अंबड तालुक्यातील 4, घनसावंगी तालुक्यातील 8, भोकरदन तालुक्यातील 5 जाफराबाद तालुक्यातील 1 अशा एकूण 28 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक बिनविरोध झाली आहे.
दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 69 टक्के मतदान
जालना तालुक्यात दुपारी साडेतीनपर्यंत 1 लाख 25 हजार 665 पैकी 86 हजार 672 मतदारांनी मतदान केले होते. दुपारपर्यंत अंदाजे 69 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्ह्यात कुठेही ही अनुचित प्रकार घडला नसून मतदान शांततेत सुरू आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती निवडणूक प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान संवेदनशील मतदान केंद्र असलेल्या चंदंनजिरा आणि मानदेऊळगावमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. या केंद्रावर बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांचा भाचा दीपक डोंगरे यांचे पॅनल उभे आहे. मामा-भाच्यामध्ये कौटुंबिक भांडणे असल्यामुळे हे केंद्र अधिक संवेदनशील बनले आहे. त्यामुळे पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.