जालना - माझ्या प्रकरणात माझा सर्व समाज माझ्या पाठीशी होता, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आज जालन्यात आलो आहे. परंतु, आरोप करायचे आणि चौकशी करण्यापूर्वीच फाशी द्यायची हे धोरण चुकीचे आहे, असे मत माजी मंत्री आमदार संजय राठोड यांनी व्यक्त केले. टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी आमदार संजय राठोड सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
आमदार संजय राठोड म्हणाले की, ओबीसी आरक्षणासंदर्भात या समाजामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. समाजावर हा एक प्रकारे अन्यायच आहे. सरकारने मागासवर्गीयांच्या पदोन्नत्या थांबवल्या आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात काय भूमिका घ्यायची यासंदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
विविध मुद्द्यांवर आमदार राठोड यांचे भाष्य -
दरम्यान, आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील मजकूर आपल्याला माहिती नाही. त्यामुळे त्यावर आपण प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. मध्यंतरीच्या काळात मंत्री पदावर कार्यरत असताना आपल्यावर केलेल्या आरोपांची शहानिशा केली नाही हे म्हणजे निर्णयाआधीच फाशी दिल्यासारखे आहे. जे चुकीचे आहे, अशा भावनाही आमदार राठोड यांनी व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला घेतलेल्या कानपिचक्या संदर्भात आमदार राठोड म्हणाले की, ज्याचा त्याने पक्ष वाढवणे ही काही चुकीची बाब नाही, आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या भावना या शिवसैनिकांना उद्देशून असल्याचेही ते म्हणाले.