जालना - जालना शहरात कोरोनाची रुग्ण संख्या आज तीनशे झाली आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच जाफराबाद सारख्या छोट्या गावांमध्ये कोरोनाचे 17 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गर्दीमुळे कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. ही गर्दी कमी करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जालना व्यापारी महासंघाच्यावतीने शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचे ठरविले आहे. हा कर्फ्यू शुक्रवार दि. 19 ते रविवार दि. 21 या तीन दिवसात लागू असणार आहे.
जालना व्यापारी महासंघाची आज एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. जालना शहरांमध्ये विविध व्यापाऱ्यांच्या 62 असोसिएशन आहेत. त्यामध्ये किराणाची सुमारे शंभर दुकाने होलसेल, तर पाचशे किरकोळ दुकाने आहेत. बियर बार वगळता चारशे हॉटेल्स आहेत. शहरातील इतर व्यापारी असोसिएशनला चोवीस तासापूर्वी जनता कर्फ्यू लागण्या संदर्भात सूचना देऊन हरकती मागविल्या होत्या. मात्र सर्वच असोसिएशननी व्यापारी महासंघाच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शेवटी व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष सतीश पंच यांनी तीन दिवस कर्फ्यू लावल्याचे जाहीर केले आहे.
या बैठकीला व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेशचंद्र तवरावाला, कार्याध्यक्ष विनीत सहानी ,जिल्हा सहकोषाध्यक्ष श्याम लोया, शहर महासचिव शिवजी कामड, सीए पियुष अग्रवाल आदींची उपस्थिती होती. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून बहुतांशी व्यापाऱ्यांनी शासनाच्या आवाहनाला पाठिंबा दिला होता. मात्र थोडी शिथिलता मिळाल्या नंतर परवानगी नसलेल्या व्यापाऱ्यांनीदेखील आपली प्रतिष्ठाने सुरू केली होती. त्यामुळे बाजारात एकच गर्दी उसळली होती. याचा परिणाम ग्रामीण भागातून अनेक लोक खरेदीसाठी शहरात आले. याचा परिणाम असा झाला की जालना शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाची रुग्ण संख्या वाढली आहे. त्यामुळे आता सामान्य जनतेसोबतच व्यापाऱ्यांचेदेखील धाबे दणाणले आहेत. कारण बहुतांश गावातील व्यापारी विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी जालना शहरात येऊन व्यापाऱ्यांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी जालना व्यापारी महासंघाने हा प्रयोग करण्याचे ठरविले आहे. या कर्फ्यू मधून शासनाच्या नियमानुसार अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.