जालना- आपल्याच संस्थेत शिपाई म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून ३४ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना संस्थेच्या अध्यक्षांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. श्रीराम राठोड, असे लाच स्वीकारणाऱ्या संस्था अध्यक्षाचे नाव आहे.
जालना शहरापासून जवळच सहाय्यक परिवहन कार्यालयाच्या रस्त्यावर श्री. तुळजा देवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अपंग निवासी विद्यालय आहे. या विद्यालयाचा शिपाई कोरोनाच्या टाळेबंदीमध्ये गैरहजर होता. दोन महिन्यांनी शाळेवर हजर झाल्यावर संस्थाचालक श्रीराम सवाई राठोड ( वय ५९ रा. इन्कम टॅक्स कॉलनी) यांनी त्याला आणखी दोन महिने घरी थांबण्यास सांगितले. त्यामुळे हा शिपाई शाळेवर हजर झाला नाही. त्यानंतर शाळेत हजर होण्यासाठी शिपाई आला असता संस्थाचालकांनी चार महिन्याचा पगार काढण्यासाठी ७२ हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले.
शिपायाला हजर करून घेतल्या नंतर त्याने मे व जून महिन्याच्या पगारापोटी २६ हजार ५०० रुपये दिले. त्यानंतर पुढील ३ महिन्याचे दरमहा ११ हजार ५०० रुपये याप्रमाणे ३४ हजार ५०० रुपयांची मागणी करण्यात आली व ते न दिल्यास हजर करून घेणार नाही अशी धमकी राठोड ( वय ५९ रा. इन्कम टॅक्स कॉलनी) यांनी शिपायाला दिली. मागितलेली लाच देण्याची इच्छा नसल्याने शिपायाने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार आज संस्थेचे अध्यक्ष श्रीराम सवाई राठोड यांना शिपायाकडून ३४ हजार ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.
कर्मचाऱ्यांच्या पगारावर होता डोळा
आपल्या संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर संस्थाचालकाचा डोळा होता. पगार झाल्यानंतर ठरलेली रक्कम लगेच संस्थाचालकाला द्यावी लागत असे. नाही तर मुख्याध्यापकांना सांगून संस्थाचालक रुजू करून घेत नसे. त्यामुळे, शिपायाने २६ हजार ५०० रुपये टाळेबंदी काळात दिले होते. आणि पुन्हा आता ३४ हजार ५०० रुपयांची मागणी होत असल्याने शिपाई वैतागला होता. त्यामुळे, त्याने सरळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आणि या तक्रारीत संस्थेचे अध्यक्ष श्रीराम राठोड हे सापडले. त्यांच्यावर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा- ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देऊ नये, जालन्यात आंदोलकांची मागणी