जालना - कोरोनामुळे ज्या शेतकरी कुटुंबाने आपला आधार गमावला आहे त्यांना मदतीचे वाटप करण्यात आले. यामध्ये 51 शेतकरी कुटुंबाला ही मदत करण्यात आली. यावेळी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेनेचे संपर्क नेते विनोद घोसाळकर उपस्थित होते. यावेळी बियाण्याचे दोन पाकीट, सात हजार रुपये रोख अशा प्रकारची मदत करण्यात आली.
'शिवसेना सर्व जागा लढविणार'
काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे मत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेच्या भूमिकेबद्दल अब्दुल सत्तार यांना विचारले असता, 'एकला चलो रे' हा त्यांचा नारा आहे. त्यावर मी काही बोलणार नाही. मात्र, शिवसेना येत्या नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व जागा स्वबळावर लढणार आहे. प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकवणार आहे. तसेच राहीला प्रश्न मुख्यमंत्रीपदाचा, तर नाना पटोले यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. ते त्यांचे मत आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी त्या पक्षाचे तेवढे संख्याबळ पाहिजे, आमच्याकडे आहे त्यामुळे पुढील साडेतीन वर्षदेखील मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरे हेच राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.