जालना : येथे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या पथकाने चंदंनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार गावठी कट्टे आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर चंदनझिरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांना ढवळेश्वर या भागांमध्ये एक जण गावठी कट्टे विकत असल्याचे माहिती काल (मंगळवारी) रात्री मिळाली. त्या अनुषंगाने खीरडकर यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, त्यांचे सहकारी देवाशिष वर्मा, निल काळे यांचे एक पथक तयार करून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पाठवले. पथकाने परमेश्वर अंभोरे (वय 34), राहणार ढवळेश्वर या व्यक्तीला ताब्यात घेतले आणि विचारपूस केली. त्यावेळी याच भागात राहणाऱ्या गणेश ज्ञानेश्वर काकडे, याला दोन पिस्तूल तर कृष्णा सलामपुरे याला एक असे तीन पिस्तूल तर चौथे पिस्तूल भोकरदन तालुक्यातील जानेफळ येथे राहणाऱ्या रामदास उत्तम मिसाळ याला विकले असल्याची त्याने कबुली दिली.
या पथकाने गणेश काकडे, कृष्णा सलामपुरे, रामदास मिसाळ या तिघांकडून गावठी बनावटीचे चार पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या पिस्तुलांची बाजारामध्ये एक लाख 60 हजार रुपये एवढी किंमत आहे. तसेच या गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ (क्रमांक एम एच 21 बीएफ 71 88) ही देखील जप्त केली आहे. दोन्ही मिळून सुमारे सात लाख दहा हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी चंदंनझिरा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.