जालना - विविध धार्मिक कार्य आणि अत्यावश्यक सुरक्षिततेसाठी पोलिसांचे संख्याबळ कमी पडत असते. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी होमगार्डला पाचारण केले जाते. मात्र, या होमगार्डचे गेल्या ३ महिन्यांपासूनचे मानधन रखडले आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.
गणेशोत्सव, दुर्गा देवी उत्सव, निवडणूक आणि आत्ताच निकाल लागलेला श्रीराम जन्मभूमीचा मुद्दा या चारही महत्त्वांच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील सुमारे 800 होमगार्डला पाचारण केले होते. मात्र, त्यांना देण्यात येणारे मानधन अद्यापपर्यंत मिळाले नाही. पर्यायाने हे सर्व होमगार्ड 'बिन पगारी फुल अधिकारी' अशा पद्धतीने काम करत आहेत. वारंवार मागणी करूनही मानधन मिळत नसल्यामुळे जावे तर कुठे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित आहे.
हे वाचलं का? - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोकरदन शहरात पोलिसांचे पथसंचलन
जिल्ह्यातील सर्वात वरिष्ठ अधिकारी म्हणून अप्पर पोलीस अधिक्षक हे या विभागाचे काम पाहतात. पोलीस प्रशासनाने बोलावल्यानंतर त्यांच्याकडून अहवाल गेल्यानंतरच या होमगार्डला मानधन मिळते. जेवढ्या दिवसाचे काम तेवढ्याच दिवसाचे मानधन अशा पद्धतीचे हे कार्य असते. त्यातही वर्षातून काही दिवसच काम मिळते आणि त्या कामाचा मोबदलाही वेळेवर दिल्या जात नाही. विशेष म्हणजे या मानधना व्यतिरिक्त त्यांना अन्य कुठल्याही शासकीय सुविधा मिळत नाहीत. अशा वेळी हातचा रोजगार सोडून कर्तव्य बजावल्यानंतरही मानधन मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
होमगार्डच्या मदतीसाठी असलेली एक पोलीस व्हॅन देखील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या या कार्यालयाच्या समोर नादुरुस्त अवस्थेत पडलेली आहे. त्यामुळे या होमगार्डची नियुक्ती ठराविक ठिकाणी केल्यानंतर स्वखर्चाने यांना त्या ठिकाणी जावे लागत आहे.
दरम्यान, होमगार्ड समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी यासंदर्भात वरिष्ठांकडे निधीची मागणी केली आहे. निधी आल्यानंतर लवकरच त्यांना मानधन मिळेल, असेही पवार यांनी सांगितले.