जालना - नाताळ, नविन वर्षांचे स्वागत अनेक जण जल्लोषात साजरा करतात. या पार्श्वभूमीवर राज्यात कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्याचा विचार आरोग्य विभागाचा नाही. मात्र, नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी दिली आहे. ओमयाक्रॉन ( Omicron ) विषाणू लवकर फैलावतो. त्यामुळे गर्दी टाळा व लस घ्या, असे आवाहनही मंत्री टोपे यांनी केले आहे.
सर्वच निवडणुका पुढे ढकण्याचा प्रस्ताव मंजूर
ओबीसीशिवाय निवडणूका नको, ओबीसींना बरोबर घेऊनच निवडणूका घ्याव्या. त्यामुळे ओबीसींना ( OBC ) बरोबर घेण्यासाठी सर्वच निवडणूका पुढे ढकला, असा प्रकारचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी (दि. 15) मांडण्यात आला असून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते जालन्यात बोलत होते. या निवडणूका रद्द करण्यासाठी आज मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलेला ठराव निवडणूक आयोगाकडे पाठवावा, असा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याची माहिती टोपे यांनी दिली.
फेब्रुवारीत ओमायक्रॉनचा परिणाम दिसेल
आपल्याला कोणत्याही परिस्थितीत कोरोना नियम पाळावे लागणार आहेत. लसीकरण वाढवावे लागणार असून या पार्श्वभूमीवर आपल्याला काळजी घ्यायची आहे. राज्यात ओमायक्रॉन रुग्ण संख्या वाढत असतील तर याचा परिणाम फेब्रुवारीमध्ये पाहायला मिळू शकतो, असा टास्क फोर्सचा अंदाज असल्याचेही टोपे यांनी नमूद केले. त्यामुळे येणाऱ्या काळात गर्दी टाळावी लागेल, असेही टोपे यांनी म्हटले आहे. निर्बंध लावण्याचा कोणताही विचार नाही पण काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
चाचण्यांचे दर निश्चित
आरटीपीसीआर ( RT-PCR ) चाचण्यांचे खासगी प्रयोगशाळेचे दर आजपासून कमी करण्यात आले असून आधी विमानतळ, रेल्वे स्टेशनवर अतिशीघ्र चाचणीसाठी 4 हजार 500 रुपये दर आधी करण्यात आला होता. त्याचा दर आता 1 हजार 975 ठेवण्यात आला आहे. थर्मोफिशरचा देखील दर 1 हजार 975 ठेवण्यात आला आहे. टाटाचा दर 979 रुपये करण्यात आले असून पीपीई किट्स उपलब्ध झाल्यास हे दर भविष्यात आणखी कमी करण्यात येतील, अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.
नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे
सक्तीच्या लसीकरणा विरोधात औरंगाबाद खंडपीठात एका शिक्षकाने केलेल्या याचिकेबाबात मंत्री टोपे म्हणाले, लसीकर हा ऐच्छिक विषय आहे. ते सक्तीचा नाही. मात्र, चांगल्या हेतूनेच विविध जिल्हाधिकारी लसीबाबत सक्ती करत आहेत, त्यांच्या हेतूवर मला शंका नाही. सध्या राज्यात दररोज 8 लाख लसीकरण केले जात असून नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहनही टोपे यांनी केले आहे.
हे ही वाचा - Mantha Cooperative Bank - शेजाऱ्यांना चहा पाजून मोदींचे आभार माना -दानवे