जालना : राज्याला सध्या 1 कोटी 75 लाख कोरोना लसीचे डोस केंद्राकडून मिळतात. केंद्राकडून लसी मिळण्याची गती चांगली आहे. आता राज्यात लसीकरणाची गती वाढवणार आहे. सध्या राज्यात 10 लाख जणांचे लसीकरण रोज होत आहे. हे लसीकरण 15 लाखांवर नेणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते. राज्यात मोठ्या लसीकरणानंतर तिसऱ्या लाटेची भीती राहणार नाही. आतापर्यंत 60 ते 65 टक्के लसीकरण पहिल्या डोसचे झाले आहे. दुसऱ्या डोसचे 30 ते 35 टक्के लसीकरण झाले आहे, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
यंदा रंगणार गरबा
नवरात्रोत्सव काळात गरबा खेळण्यास सांस्कृतिक विभागाची मान्यता आहे. राज्यात तीन पध्दतीने गरबा खेळला जातो. उघड्यावर गरबा खेळायचा असल्यास सोशल डिस्टन्स आणि मास्क बंधनकारक असणार आहे. पण सभागृहात गरबा खेळायचा असेल तर मास्क आणि सभागृहात फक्त एकूण क्षमतेच्या 50 टक्केच लोक उपस्थित राहतील, याची दक्षता सभागृहाच्या मालकाने घ्यायची आहे, असंही टोपे यांनी सांगितलं आहे.
लहान मुलांसाठी इम्युनिटी बुस्टींग किट
गरबा खेळादरम्यान सेवा देणाऱ्या लोकांनी म्हणजेच केटरिंगवाल्यांनी दोन्हीही डोस घेतलेले असणं गरजेचं आहे. भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनें लहान मुलांसाठी इम्युनिटी बुस्टींग किट बनवली आहे. लहान मुलांसाठी टी4 उपयुक्त ठरेल, हा स्वागतार्ह निर्णय आहे, असंही टोपे म्हणाले.
पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ NDRF ची मदत दिली जाणार आहे. त्या व्यतिरिक्त आणखी काय मदत केली जाईल, यावर देखील विचार सुरू आहे. सरसकट पध्दतीने पंचनामे करण्याची मागणी मंत्रिमंडळ बैठकीत केली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - भ्रष्टाचार प्रकरणातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई करा - किरीट सोमैय्यांची राज्यपालांकडे मागणी