जालना - अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या हिरपूरमधल्या एका तीन दिवसीय चिमुकलीला एचआयव्ही संक्रमित व्यक्तीचे रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी पीडित चिमुकलीच्या नातेवाईकांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणाची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली असून याची चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली, ते जालन्यात बोलत होते.
या प्रकरणात रक्तदात्याकडून रक्त घेताना त्याच्या ब्लड बँकेने रक्ताची तपासणी केली नव्हती का? आणि हे रक्त खासगी दवाखान्यात त्या चिमुकलीला देताना, त्यावेळीही रक्ताची तपासणी का करण्यात आली नाही? याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोन ते तीन दिवसांत या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर कठोर संबंधित दोषींकारवाई केली जाईल,अशी माहिती टोपे यांनी दिलीय. तसेच अशा घटना समोर आल्यानंतर एसबीटीसीकडून त्वरीत कारवाई केली जाते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
काय आहे प्रकरण?
मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील एका महिलेला आठ महिन्याआधी एक गोंडस मुलगी झाली होती. तिसऱ्या दिवशी त्या चिमुकलीची प्रकृती खराब झाल्याने तिला मूर्तिजापूर येथील बालरोग तज्ञ डॉ. प्रशांत अवघाते यांच्याकडे दाखल केले. मुलीची प्रकृती चिंताजनक होत असल्याने तिच्या विविध चाचण्या केल्यात. तिच्या रक्तातील पेशी कमी असल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांनी त्यावेळी तिला अकोला येथील बी. पी. ठाकरे ब्लड बँकेतून आणलेल्या रक्ताच्या पेशी दिल्या होत्या.
कालांतराने त्या चिमुकलीला ताप जास्त येत असल्याने तिला परत डॉ. अवघाते यांच्याकडे दाखल करण्यात आले. त्यांनी या चिमुकलीच्या चाचणीसाठी तिला अमरावती येथे पाठविले. तिच्या चाचण्या केल्यानंतर त्या चिमुकलीला एचआयव्ही असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. एचआयव्ही चाचणीमध्ये ती चिमुकली पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांनी त्या चिमुकलीच्या आई व वडिलांची एचआयव्ही चाचणी केली. त्यामध्ये ते निगेटिव्ह आले होते. त्यानंतर ठाकरे ब्लड बँकेतील रक्तातूनच तिलाही बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने पीडित मुलीच्या नातेवाईंकांनी आरोग्य मंत्र्यांकडे या प्रकरणाची चौकशीची मागणी केली होती.
राज्यात सध्या कोणतेही निर्बंध आणि लॉकडाऊन नाही -टोपे
सध्य स्थितीत राज्यात लॉकडाऊन अथवा निर्बंध वाढवण्याच्या दृष्टीने कोणताही निर्णय झालेला नाही. ज्यावेळी राज्यात ७०० मेट्रिक टन पेक्षा अधिक ऑक्सिजन लागेल, त्यानंतरच राज्यात लॉकडाऊन किंवा निर्बंध लावले जातील अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी दिली.