जालना - शहरातील एमआयडीसी भागातील एका गोडाऊनवर छापा टाकून पोलिसांनी गुटख्याचा मोठा साठा जप्त केला. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. या साठ्याची किंमत साधारणपणे ५० लाख रुपये आहे.
या गोडाऊनमध्ये गुटख्याचा मोठा साठा असून, तो काही वाहनांतून बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी पथकासह सकाळीच छापा टाकला. पोलिसांनी गोडाउनची झडती घेतली असता, गोडाऊनमध्ये व तिथे उभ्या असलेल्या तीन पीकअप टॅम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा होता. याठिकाणी उभी असलेली एक ब्रेंझा कार, दोन मोटारसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. यावेळी गोडाऊनमधून टेम्पोमध्ये गुटखा भरणारे 2 जण ताब्यात घेतले आहेत. तर अन्य काही लोक पळून गेले. अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्यासह पथकातील कर्मचारी प्रदीप घोडके, विशाल काळे, ज्ञानेश्वर केदारे आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.