जालना - जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पालकमंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, आमदार नारायण कुचे यांनी बदनापूर तालुक्यातील भराडखेडा गावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.
मी देखील शेतकरीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना मी जाणतो. सरकारने सरसकट अनुदान देण्याचे धोरण ठेवलेले आहे. 33 टक्क्यांपेक्षा जास्त भागाचे नुकसान झालेले प्रथमदर्शनीच दिसत आहे. ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्वांना अनुदान वाटप होईल. हे अनुदान केंद्र सरकार, राज्य सरकार व पिक विमा कंपन्यांकडून संयुक्तरीत्या दिले जाईल, अशी माहिती बबनराव लोणीकर यांनी दिली. जिल्हाधिकारी आजच (शुक्रवारी) अहवाल तयार करणार असून सर्व शेतकऱ्यांना अनुदान मिळेल, असे लोणीकरांनी अनौपचारिकरित्या बोलताना सांगितले. जिल्ह्यातील एकूण 6 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 5 लाख हेक्टर क्षेत्र हे नुकसानग्रस्त धरले जाणार आहे.
हेही वाचा - काँग्रेसची दिल्लीतील बैठक संपली, सध्या वेट अँड वॉच ची भूमिका
बदनापूर तालुक्यासह संपूर्ण जालना जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसलेला आहे. काढणीला आलेले मका, बाजरी, सोयाबिन या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नगदी पीक कापसाचीही नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे ऐन दिवाळीच्या काळात संकट उभे राहिले. त्या अनुषंगाने तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून आणि पीक विमा कंपन्यांकडून मदतीची अपेक्षा होती.
हेही वाचा - अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी - अण्णा हजारे
दरम्यान, 30 ऑक्टोबरलाच मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचे पंचनामे करून ताबडतोब नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्या अनुषंगाने जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी भराडखेडा, कडेगाव व सेलगाव येथील शेतीला भेटी दिल्या. यावेळी मक्याच्या कणसाला कोंब येऊन कणसात मका उगवलेली पालकमंत्र्याच्या निदर्शनास आले.
पालकमंत्री लोणीकर यांच्यासोबत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, आमदार नारायण कुचे, तहसीलदार छाया पवार, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के हे उपस्थित होते.