जालना : आपल्या राज्यातून बाहेर उद्योग चालले, यावर जनतेसमोर चर्चा करूयात असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिले. ही चर्चा जिथे तुम्ही करायला तयार आहात तिथे मी येईन. वेळप्रसंगी वर्षावरही चर्चेसाठी बोलावले तरीही यायला तयार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. शिवसंवाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे हे जालन्यातील सोमठाणा येथे आले होते. यावेळी आयोजित सभेत त्यांनी राज्य सरकारला हे आव्हान दिले आहे.
मुख्यमंत्र्यांवर टीका : शिवसंवाद यात्रेदरम्यान ते म्हणाले की, स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके असे हे सरकार आहे. मात्र कुणाचा शो फ्लॉप झाला याचा मी आनंद साजरा करत नाही, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री हे नाव न घेता ठाकरे कुटुंबावर टीका करत असून ते ठाकरे परिवाराला संपवायला निघाले. हे त्यांनी सांगून दाखवावे, असे आव्हान देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. शिवाय यांना महाराष्ट्राचे 5 तुकडे करायचे आहे, असे सांगत हे सरकार निवडणूक घ्यायला घाबरते, अशी कोपरखळी त्यांनी राज्य व केंद्र सरकारला लगावली.
मुख्यमंत्र्यांना आव्हान : राजीनामे देऊन तुमच्यात निवडणूक लढण्याची हिम्मत नाही. वेदांतासारखे अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेर कोणी घालवले यावर खूली चर्चा करा, असे आव्हान त्यांनी दिले आहे. येत्या अधिवेशनात महापुरुषांचा अवमान करणारे महाराष्ट्र द्वेष्टे राज्यपाल ठेवणार की नवीन राज्यपाल आणून दाखवणार असे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
अजून काही उद्योग राज्याबाहेर जाणार ? : शिंदे सरकारच्या सहा महिन्यांतील कारभारावर आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे चित्र सध्या विचित्र झाले असून घोषणा आणि जाहिरातीत या सरकारने अमेरिकेला मागे टाकले. अतिवृष्टीचे पंचनामे झाले, मात्र शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही, प्रोत्साहन अनुदानाच्या बाबतीतही तशीच स्थिती आहे. महिला असुरक्षित तर उद्योगधंदे महाराष्ट्रातून बाहेर जात असल्याने तरुणांना रोजगार नाही. उद्योजकांना या सरकारवर विश्वास नसल्याने राज्यातून आणखी काही उद्योग मध्यप्रदेशात जाण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला.
दावोस दौऱ्यावर केली टीका : आपण 48 तास स्कॉटलंड येथे राहून राज्यात 80,000 कोटींची गुंतवणूक आणली. मात्र विद्यमान मुख्यमंत्र्यांनी स्कॉटलंड येथे 28 तासांच्या वास्तव्यावर 40 खोके खर्च करून काहीच आणले नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांना केली. आपण शेतकरी व सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेत, आपला आशीर्वाद घेण्यासाठी संवाद यात्रा सुरू केली आहे.
जालन्यात शिवसंवाद यात्रा : जालना जिल्ह्यातील बदनापुर तालुक्यातील सोमठाणा येथे शिवसंवाद याञेस प्रतिसाद मिळाला. या निमित्त आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, उपनेते लक्ष्मणराव वडले, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, माजी आमदार शिवाजी चौथे, संतोष सांबरे, जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर, ए. जे. बोराडे, जिल्हा संघटक भानुदासराव घुगे, माजी जि. प. सदस्य कैलास चव्हाण, बबलू चौधरी, बाळासाहेब वाकुळणीकर, रमेश पाटील गव्हाड, भगवानराव कदम, माधवराव हिवाळे,बर्डे, बाबुराव पवार, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, पद्माकर पडूळ, संतोष नागवे,नंदकिशोर दाभाडे, सरपंच स्वातीताई नागवे, युवा सेना विस्तारक भरत सांबरे आदी उपस्थित होते.