जालना - जिल्ह्यातील सोमनाथ जळगाव येथील एका तरुणाचे चंद्रपुरातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले. त्यांना लग्न देखील करायचे होते. मात्र, मुलगी २२ वर्षाची, मुलगा फक्त १९ वर्षाचा असल्याने त्यांचे लग्न कायद्याच्या कचाट्यात सापडले आहे. मुलाच्या घरच्यांनी मारहाण करून घराबाहेर काढल्याचा आरोप मुलीने केल्यामुळे प्रकरण पोलिसात गेले आहे.
संबंधीत मुलगी चंद्रपूर येथील रहिवासी असून पुण्याला कामानिमित्त स्थायिक झाली होती. तिची सोमनाथ जळगावातील एका तरुणाशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर शारीरिक संबंध देखील जुळून आले. त्यानंतर हा मुलगा गावाकडे परत आला. मुलीने त्याचा शोध घेत दोनवेळा सोमनाथ जळगाव गाठले. यापूर्वी संबंधीत तरुणी त्या तरुणाच्या घरी आली होती. त्यावेळी तरुणाच्या कुटुंबीयांनी दोघांच्याही लग्नाला होकार दिला होता. मात्र, आता पुन्हा ती त्यांच्या घरी आली असता तरुणाच्या कुटुंबीयांनी तिला मारहाण केली. तसेच तिला घराबाहेर हाकलून लावले, असा आरोप मुलीने केला आहे. रविवारी दुपारी हा सर्व प्रकार घडला असून तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या खुणा नसल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. आज २९ जुलैला तिची शासनाच्या सेवाभावी संस्थेकडे रवानगी करण्यात आली. येथे तिचे समुपदेशन करणे सुरू आहे.
संबंधीत तरुणासोबत तिला आजच लग्न करायचे आहे. लग्न झाले नाहीतर त्याच्याविरोधात तक्रार देण्याची धमकी देखील तिने दिली आहे. तरुणाने देखील लग्नाला होकार दिला आहे. मात्र, तिचे वय २२ वर्ष असून तरुणाचे वय १९ वर्ष आहे. त्यामुळे हे लग्न कायद्याच्या कचाट्यात सापडले आहे. याप्रकरणी जालना तालुका पोलीस ठाण्यात मुलीचा जबाब नोंदवला आहे. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.