जालना - ऑरेंज झोनमध्ये असलेल्या जालना जिल्ह्याला काही व्यवहारांमध्ये सूट मिळाली आहे. याचा गैरफायदा घेत वाहनचालक मोठ्या संख्येने रस्त्यावर आले आहेत. त्यातच तोंडाला मास्क किंवा कापड देखील बांधले नव्हते, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने मास्क लावण्याचे निर्बंध जारी केले आहेत.
प्रशासनाच्या निर्देशानुसार जालना नगरपालिकेच्या वतीने विविध चौकांमध्ये उभे राहून मास्क न लावता फिरणाऱ्या वाहनचालकांना पाचशे रुपये दंड आकारला जात आहे. मंगळवारी बाजारात ही मोहीम सुरू केली होती. आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकाळी मास्क न लावता वाहनांवरून फिरणाऱ्या वाहनचालकांना चौकशी करून दंड आकारला. यामध्ये दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहने या सर्वच वाहनांचा समावेश होता. नगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांच्या माध्यमातून ही कारवाई सुरू आहे.