जालना - संतश्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी पंढरपूर येथून शेगावकडे परत जात असताना शनिवार दुपारी जालना शहरात दाखल झाली. उत्साहाच्या वातावरणात नागरिकांनी श्रींचे दर्शन घेतले. सुरेख फुलांच्या सजावटीने पालखी शोभून दिसत होती. पालखी सोबत असलेल्या वारकऱ्यांची शिस्त अवर्णनीय होती.
अंगावर पांढरेशुभ्र कपडे, डोक्यावर पांढरी टोपी, हातात पताका आणि गळ्यात टाळ अशा शिस्तबद्ध पद्धतीने हरिनामाचा गजर करत हे वारकरी मार्गक्रमण करत होते. पालखी शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस जालन्यात मुक्कामाला राहणार आहे. सोमवारी सकाळी पालखी विदर्भाकडे रवाना होईल .
श्रींच्या पालखीचे हे 52 वे वर्ष आहे. पालखीसोबत तीन अश्व, नऊ वाहने आणि 550 वारकऱ्यांचा ताफा आहे. जुन्या जालन्यातील गांधी चमन जवळ असलेल्या काळुंका माता संस्थेमध्ये ही पालखी विसावणार आहे. रविवारचा मुक्काम नवीन जालन्यातील बजरंग दल मिल येथे होणार आहे. त्यानंतर ही पालखी शेगावकडे रवाना होईल.