जालना - पैशाची गरज असल्याचे भासवत झटपट लग्न करून तरुणाची फसवणुक करणाऱ्या खोट्या नवरीसह इतर चौघांना पोलीसांनी अटक केली आहे. जिल्ह्यातील निधोना येथे ही घटना उघडकीस आली आहे.
याबद्दल सविस्तर माहिती अशी, की निधोना येथील एक तरुण लग्न करण्यासाठी मुलीच्या शोधात होता. याच दरम्यान एक जानेवारीला परभणी जिल्ह्यातील मानवत येथील एका टोळीने या लग्नाळूचे घर गाठले. या टोळीत नवरी मुलगी, तिची बहीण, त्या बहिणीचा नवरा, आणि मामा असे चार जण होते. मुलीची आई आजारी असते, त्यामुळे आम्हाला तिचे लवकर लग्न करायचे आहे, असे सांगून त्या तरुणाचे त्याच्या घरासमोरच दुपारी 3 वाजता लग्नही लावले.
मात्र, पुढील दोन-तीन दिवसातच नववधू पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे आणि काहीना-काही कारणाने त्याला टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे तरुणाच्या लक्षात आले. त्यामुळे संशय येऊन त्याने तिच्याबाबत बाहेर चौकशी केली असता, तिचे पूर्वीच लग्न झाले असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे नुकतेच लग्न झालेल्या या नवरदेवाने सरळ चंदंनजिरा पोलीस ठाणे गाठून आपली कैफियत मांडली. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तपास सुरू केला असता, बनावट लग्न लावून देऊन पैसे हडप करणाऱ्या टोळीबद्दल माहिती समोर आली.
परभणी जिल्ह्यातील मानवत येथे ही टोळी कार्यरत आहे. तुळशीराम नीलपत्रेवार हा या टोळीचा सूत्रधार असून, या प्रकरणातील मुलीच्या बनावट बहिणीचा तो नवरा आहे. लग्न लावून दिलेल्या मुलीचे यापूर्वी लग्न झाले असून तिचा नवरा सचिन मधुकर आठवे हा मुंबईतील चुनाभट्टी येथे राहतो. त्याच्यापासून या तिला दोन अपत्य असून ती नवऱ्यापासून विभक्त होउन राहते.
दरम्यान, पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने या प्रकरणाची हकीकत सांगितली. मुलीचे लग्न झालेले आहे तरीदेखील आम्ही मुद्दाम तिची आई आजारी असल्याचा बहाणा करून तिचे दुसरे लग्न लावून दिले, आणि तीस हजार रुपये घेतले. तसेत लवकरच दवाखान्याच्या खर्चाच्या नावावर आणखी रक्कम घेऊन नवरी पळ काढणार होती, मात्र त्यापुर्वीच हे प्रकरण उघडे पडले, अशी कबुली त्याने दिली.
या प्रकरणामुळे तक्रारदार नवरदेवाचे मात्र धाबे दणाणले आहेत. 'खाया पिया कुछ नही, ग्लास फोडा बारा आना' अशी त्याची गत झाली आहे. लग्न झाले, पैसेही गेले आणि पुढे लग्नासाठी दुसरी मुलगी मिळणार की नाही या भीतीपोटी पोलीस ठाण्यात आपले नाव उघड न करण्याची विनंतीही त्याने केली. दरम्यान, या प्रकरणातील तरुणाकडून उकळलेल्या 30 हजार रुपयांपैकी वीस हजार रुपये वसूल करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी नवरी, बहिण, तिचा नवरा आणि मामा अशा चौघांविरुद्ध चंदंनजिरा पोलीत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हेही वाचा - महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्यांना घोषित रक्कम मिळाली नाही, काका पवारांच्या गौप्यस्फोट