जालना - हरवलेल्या व्यक्तीचा शोध लागत नसल्याचा ठपका पोलीस प्रशासनावर नेहमीच असतो. त्याला कारणेही अनेक आहेत आणि हरवलेला व्यक्ती पुन्हा घरी आल्यानंतर नातेवाईक देखील त्याचा शोध लागला आहे आणि तो घरी आला आहे अशी माहिती पोलिस ठाण्याला देण्याचा त्रास घेत नाहीत. त्यामुळे पोलीस दरबारी हा आकडा कायमच असतो. याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलची नियुक्ती केली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसायला लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कदीम जालना पोलिस ठाण्यातील राहुल जोंधळे यांना अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी एका महिन्यामध्ये तब्बल 40 हरवलेल्या व्यक्तींचा शोध लावल्याबद्दल 24 बक्षिसे जाहीर केली आहेत.
विशेष नियुक्ती -
अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी हरवलेल्या व्यक्तीचा शोध लावण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आणि त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती केली. या कर्मचाऱ्याकडे फक्त हरवलेल्या व्यक्तींचा तपास लावण्याचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे आज हे कर्मचारी सक्षमतेने हे काम करीत आहेत. यापूर्वी हे काम इतर कामे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्या कडेच सोपविली जात होती. पर्यायाने कामाच्या व्यापामुळे हे तपास लागत नव्हते. आता या तपासाची गती वाढली आहे 2010 पासून सुमारे 540 व्यक्ती हरवल्याची नोंद कदीम जालना पोलिस ठाण्यात आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांच्या नोंदी असल्यामुळे त्यातील काहीजण घरी परतले आहेत तर काहींचा शोध लागणे कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये 6 मार्चला नियुक्ती झाल्यानंतर गेल्या एक ते दीड महिन्यात राहुल नारायण जोंधळे या पोलिस कर्मचाऱ्याने चाळीस हरवलेले व्यक्तींचा शोध लावला आहे.
काही महत्वाचे शोध -
- महत्वाच्या शोधामध्ये अलीकडेच एका मंत्र्याच्या घरी काम करणाऱ्या मुलीचे अपहरण झाले होते. त्याचा शोधही जोंधळे यांनी लावून दोन्ही पक्षांना समजावून सांगून तीला घरी परत आणले.
- दारू पिण्याच्या व्यसनामुळे घरच्यांसोबत वारंवार होणाऱ्या भांडणाला वैतागून नोव्हेंबर 2011 मध्ये एक 44 वर्षीय गायब झाला होता. त्या वेळेपासून घरच्यांनी खूप शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नाही. राहुल जोंधळे यांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो 8 मार्चला पुणे येथे सापडला. दरम्यानच्या काळात त्या व्यक्तीच्या रहिवासाविषयी विचारले असता तो मिळेल ते काम करत होता, आणि काही दिवस वेश्या व्यवसायाची निगडित असलेल्या समन्वयाचे देखील काम केल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडे कसल्याही प्रकारचे संपर्काचे साधन नसल्यामुळे त्याचा शोध लागत नव्हता. सदरील इसमाला शोधून जोंधळे यांनी त्याला त्याच्या परिवाराच्या स्वाधीन केले आहे.
- मागील महिन्यात जालन्यातील शिरसागर परिवारातील एका वीस वर्षाचा मुलाचा विवाह मामाच्या मुली सोबत ठरला होता. मात्र तो वर्ग मैत्रिणीसोबत औरंगाबादला पळून गेला. घरच्यांशी काहीही संपर्क होत नव्हता राहुल जोंधळे यांनी या मुलाचा शोध लावला. मुलगा परिवारात एकुलता एक असल्याने घरच्यांनी त्याला मुलीसह स्वीकारण्यासाठी संमती दिली आहे. मात्र मुलगाच घरी येण्यासाठी तयार नसल्याने परिवार पोलीस दरबारी चकरा मारत आहे, आणि मुलाला घरी पाठविण्यासाठी पोलिसांना गळ घालत आहे.