जालना - राज्यात काल दिवसभरात 9 लाख 36 हजार जणांना लसीकरण करण्यात आले असून हा राज्यातील लसीकरणाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिली. ज्या दिवशी महाराष्ट्रात 700 मॅट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी महाराष्ट्रात लॉकडाऊन लावला जाईल, असे म्हणत आरोग्यमत्र्यांनी लॉकडाऊनबाबत दुजोरा दिला आहे. ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढली असली तरी शाळा आणि महाविद्यालयासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा करून शाळा कॉलेज बंद अथवा सुरू करण्याबाबत स्वतंत्र निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी सांगितले.
'...तर दोन महिन्यात लसीकरण पूर्ण'
राज्यातील लसीकरणाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून 9 लाख 36 हजार जणांचे काल दिवसभरात लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजेश टोपे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. राज्यात दररोज आपल्याला 15 लाखांपर्यंत लसीकरण करायचे आहे, मात्र त्यासाठी लस उपलब्ध होणे गरजेचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले. राज्यात लसीकरणाचा वेग असाच कायम राहिल्यास दीड ते दोन महिन्यात लसीकरण पूर्ण होईल. त्यासाठी केंद्राने लसी लवकर उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीदेखील टोपे यांनी केली.
'डेल्टा प्लसच्या रुग्णांवर योग्य उपचार सुरू'
राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यांच्यावर योग्य उपचार सुरू असून त्यांच्या संपर्कातील लोकांना ट्रेस करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यातून 100 नमुने तपासणीसाठी पाठवले जात असल्याचे टोपे म्हणाले.
'महाराष्ट्रातील डॉकडाऊन बाबत दिला दुजोरा'
ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढली असली तरी शाळा आणि महाविद्यालयांसंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा करून शाळा कॉलेज बंद अथवा सुरू करण्यासंदर्भात स्वतंत्र निर्णय घेतला जाईल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली. शिवाय राज्यात सध्या एकाच प्रकारचे निर्बंध असून आजपासून लोकलमध्ये लसवंतांना प्रवासासाठी मुभा देण्यात आल्याचे ते म्हणाले. तिसरी लाट येण्याची शक्यता केंद्राने वर्तवली आहे, त्यामुळे ही लाट लवकर येऊ नये यासाठी राज्यातील जनतेने नियमांचे पालन करावे, असे सांगत लसीकरणाला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा जेणेकरून तिसरी लाट सौम्य राहील, असे ते म्हणाले. ज्या दिवशी महाराष्ट्रात 700 मॅट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी महाराष्ट्रात लॉकडाऊन लावला जाईल, असेही टोपे म्हणाले.