जालना - राज्य आणि देशातील थोर व्यक्ती , समाज सुधारक यांचे स्मरण व्हावे, त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी, म्हणून शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींची जयंती, राष्ट्रीय दिन साजरे करण्याची पद्धत आहे. त्या थोर व्यक्तींच्या जयंतीच्या यादीत आणखी ५ नावांची भर पडली आहे. त्या थोर व्यक्तीचीही जयंती आता शासकीय कार्यालयात साजरी केली जाणार आहे. या संदर्भात डिसेंबर महिन्यात राज्य शासनाने परिपत्रक काढले होते.
हे आहेत ते नवीन थोर पुरुष
- बाळासाहेब ठाकरे जयंती, 23 जानेवारी.
- संत सेवालाल महाराज जयंती, 15 फेब्रुवारी.
- आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती, 16 फेब्रुवारी .
- केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती, 17 सप्टेंबर.
- डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख जयंती, 27 डिसेंबर.
या नवीन परिपत्रकानुसार मंगळवारी मराठीचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातही पहिल्यांदाच जांभेकरांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह नायब तहसीलदार विक्रांत मोंढे, मयूरा पेरे, राजेंद्र शिंदे ,संपदा कुलकर्णी, छाया कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर-
16 फेब्रुवारी 1812 रोजी देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म झाला. त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण या नावाने 6 जानेवारी 1832 ला सुरू केले. इंग्रजी आणि मराठी भाषेत याचा मजकूर असायचा. त्यामुळे सहा जानेवारी हा दर्पण दिन अथवा वृत्तपत्र दिन म्हणून साजरा केला जातो. आता शासन निर्णयानुसार बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांची जयंती 16 फेब्रुवारीला साजरी होणार आहे. पत्रकारिते सोबतच बाळशास्त्री जांभेकर यांनी समाज कार्य देखील स्वीकारले होते, त्यामध्ये विधवांचा पुनर्विवाह ,स्त्री-शिक्षण या क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले आहे.