जालना - राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. या काळात अंत्यविधीस फक्त २० नातेवाईकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. तरीही जालन्यात कोरोनाबाधित रुग्णाच्या अंत्यविधीला शहरातील प्रतिष्ठित चोवीस नागरिकांसह सुमारे १०० जण उपस्थित होते. याप्रकरणी सदर बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीचा १ जून रोजी मृत्यू झाला होता व २ जून रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याच दिवशी मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल प्रशासनास प्राप्त झाला. हा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आपत्ती व्यवस्थापनाचे आदेश धुडकावून लावत अंत्यविधीसाठी वीस नातेवाईकांनी एकत्र येणे अपेक्षित होते. असे असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संजय शिवाजीराव देशमुख यांच्या तक्रारीवरुन कलम 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.