जालना - सोलापुरातील अल्पवयीन मुलीचा जालन्यात आणून विवाह लावल्याप्रकरणी मुलीचे नातेवाईक, नवरदेव, पुरोहित यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात मुलीला खरेदी-विक्री करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा पोलिसांनी केला असून त्या दिशेने पोलीस तपास चालू आहे. याप्रकरणी नवरदेव वल्लभ शामसुंदर कुलकर्णी(30) आणि पुरोहित सुमित सुरेशराव कुलकर्णी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुलगी सोलापुरात तिच्या मामाकडे लहानपणापासून राहते. त्यांनी 4 जुलैला मुलीला जालन्यातील स्वयंवर मंगल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या एसटी कॉलनीत राहणाऱ्या श्यामसुंदर कुलकर्णी यांच्याकडे आणले. सोबत मुलीची मामी, आजी, तिची घरमालकीण हे सर्वजण होते. यावेळी श्यामसुंदर कुलकर्णी यांचा मुलगा वल्लभसोबत विवाहासाठी बोलणी करण्यासाठी सर्व जमले होते. याचवेळी दोन्हीकडच्या मंडळींमध्ये सहमती झाली आणि धार्मिक विधीसाठी पुरोहित सुमित कुलकर्णी यांना बोलावले. हा विधी झाल्यानंतर मुलगी पाच दिवस याच घरात होती. त्यानंतर मुलीलाही काहीतरी वेगळे वाटल्याने तिने सोलापूर येथील तिच्या मित्राशी संपर्क साधला आणि त्या मित्राने जालन्यातील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाचा नंबर दिला. या नंबरवर फोन केल्यानंतर काही कारणाने तो फोन उचलला गेला नाही. मात्र, या नंबरवर पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून फोन आला आणि तपासाची चक्रे फिरली. या नंबरच्या लोकेशनवरून कदीम जालना पोलिसांनी छापा टाकला असता तिथे ही अल्पवयीन मुलगी राहत असल्याचे लक्षात आले. तसेच या मुलीचा विवाह वल्लभसोबत लावून दिल्याचेही निष्पन्न झाले.
दरम्यान, या प्रकरणाची अधिक माहिती घेतली असता ही मुलगी लहानपणापासूनच तिच्या आजोळी म्हणजेच मामा, मामी कडे सोलापूर येथे राहत होती. दरम्यानच्या काळात मुलीच्या आईने दुसरा विवाह केला. परंतु, या मुलीच्या दुसऱ्या वडिलांना हे माहीत नव्हते की, त्यांच्या दुसऱ्या पत्नीला एक मुलगी देखील आहे. तसेच या प्रकरणातील मुलीची घर मालकीण ही मुलीची चुलत आत्या आहे. या आत्याच्या संपर्कात पुणे येथील एक पुरोहित आल्याने या दोघांनी मिळून हा व्यवहार केला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
पोलिसांनी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून, मुलीचे मामा, मामी, आजी, घर मालकीण यांच्यासह जालन्यातील श्यामसुंदर कुलकर्णी, वल्लभ कुलकर्णी, मुलीची आई आणि लग्न लावून देणारे पुरोहित सुमित कुलकर्णी यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा 2007 अन्वये शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोड करत आहेत. आत्तापर्यंत मुलीवर अधिकार सांगण्यासाठी कोणीही पुढे न आल्यामुळे या मुलीला सध्या बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.