बदनापूर (जालना) - तालुक्यातील कडेगाव आणि परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा मिळावी. यासाठी ४० लाख रुपये खर्चून आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधण्यात आली. मात्र, चार वर्षे उलटली तरी या इमारतीचे उद्घाटन न झाल्यामुळे ही इमारत वापराविना पडून होती. यासंदर्भातील वृत्त ईटीव्ही भारतने प्रकाशित करताच आमदार नारायण कुचे यांनी याचा पाठपुरावा केला. अखेर या इमारतीचे मंगळवारी (02 जून) उद्घाटन करण्यात आले. ईटीव्ही भारतच्या इम्पॅक्टमुळे आणखी चांगली आरोग्य सुविधा मिळणार असल्याने ग्रामस्थांनी ईटीव्ही भारतचे आभार व्यक्त केले.
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले आहेत. तर गावांमध्ये उपकेंद्र सुरू केलेले आहेत. मात्र, उपकेंद्रांना इमारती नसल्यामुळे आरोग्य कर्मचारी मनात येईल तेव्हा येतात आणि निघून जातात. इमारतीअभावी होणारी अडचण लक्षात घेता बदनापूर तालुक्यातील कडेगाव ग्रामपंचायत आणि आमदार कुचे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करून इमारतीचे बांधकामासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर शासनाने कडेगाव प्राथामिक आरोग्य उपकेंद्र इमारतीसाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करून चार वर्षांपूर्वी इमारतीचे बांधकामही पूर्ण झाले.
बांधकाम झाल्यानंतरही या इमारतीचा उपयोग आरोग्यसेवेसाठी होत नव्हता. त्यामुळे आरोग्य केंद्र म्हणजे 'असून अडचण नसून खोळंबा' अशी परिस्थिती झाली होती. याबाबतचे वृत्त 21 मे रोजी ईटीव्ही भारतने प्रकाशित केल्यानंतर आरोग्य विभागाला खडबडून जाग आली. तसेच आमदार कुचे यांनीही त्वरित पाठपुरावा करून कोरोना संकटकाळात ग्रामस्थांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी उपयोगी असणाऱ्या या इमारतीचे उद्घाटन केले.
या उद्घाटनप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खादगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, हरिश्चंद्र शिंदे, गणेश कोल्हे, गजानन काटकर, हरिभाऊ मोरे, आरोग्य पर्यवेक्षक सुदेश वाठोरे, काटकर, डॉ. सीमा पणाड आदींची उपस्थिती होती. यावेळी कुचे यांनी या इमारतीचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनीही येथेच थांबून आरोग्य सेवा द्यावी, असे आवाहन केले.