जालना - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेसच्या विलास औताडे यांनी आज उमेदवारी अर्ज जालना लोकसभा मतदारसंघातून दाखल केला. त्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत त्यांची पत्नी वैशाली, बहीण किरण पेरे, यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल, आदींची उपस्थिती होते.
विलास औताडे यांचे निवासस्थान औरंगाबाद येथे आहे. मात्र, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने त्यांचा पूर्ण परिवार जालना येथे उपस्थित होता. त्यांचे वडील केशवराव औताडे, मुलगा विश्वास, बहिण किरण, जावई, असे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
सकाळी ११ वाजता गायत्री लॉन येथे सर्व कार्यकर्ते जमले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांना येण्यासाठी होत असलेला उशीर पाहून जमलेल्या पदाधिकाऱ्यांनी साडेबारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि अर्ज भरण्यास सुरुवात केली. दरम्यान आमदार टोपे देखील उपस्थित झाले. मात्र, प्रशासनाच्या वतीने पाच उमेदवारांना प्रशासकीय इमारतीमध्ये सोडण्यात आले. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांची इच्छा अपूर्णच राहिली.
५० वर्षे वयाच्या विलास औताडे यांचे शिक्षण बी.ए पर्यंत झाले असून सध्या ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य, तसेच हरसिद्धी शिक्षण संस्था हरसूल, औरंगाबाद या संस्थेचे सचिव म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. यापूर्वी त्यांनी एनएसयूआयचे औरंगाबाद शहर उपाध्यक्ष पद, औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, हरसूल विविध विकास सेवा सोसायटी औरंगाबादचे चेअरमन, काँग्रेस सेवादल औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष, देवगिरी साखर कारखाना फुलंब्रीचे उपाध्यक्ष अशी अनेक पदे भूषवली आहेत.