जालना - केंद्रीय मनुष्यबळ विभागाच्या वतीने मागील 16 वर्षांपासून सुरू असलेला राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प मुदतीपूर्वीच म्हणजे 30 नोव्हेंबरला बंद करण्यात आला होता. या प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांचे 6 महिन्यांचे वेतन थकल्यामुळे या कामगारांपैकी काही कामगारांनी एकत्र येऊन आज (दि. 26 जानेवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.
दरम्यान, सुमारे तीनशे कामगार असलेल्या या प्रकल्पात काही महिलांनी एकत्र येत लोकशाही मार्गाने दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकल्प संचालकांनी या महिलांपैकी काही महिलांना बोलावून घेत प्रकल्प लवकरच सुरू होईल, असे आश्वासन दिले. तसेच अशा प्रकारची आंदोलने केली तर पुन्हा कामावर घेणार नाही, असे पद्धतीने धमकावले असल्याचा आरोप उपोषणकर्त्या महिलांनी केला आहे. त्यामुळे काही महिलांनी प्रत्यक्ष जरी उपोषणात सहभाग घेतला नसला तरी पाठिंबा दिलेला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - 'तान्हाजी' चित्रपटात 'चुलत्या'ची भूमिका साकारणाऱ्या कैलास यांचा भोकरदनमध्ये सत्कार
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात उपोषणकर्त्यांनी, थकित मानधन त्वरित देण्यात यावे. प्रकल्प कालावधीपर्यंत पूर्ववत नेमणूक देऊन बंद केलेले केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावेत. जिल्हाधिकाऱ्यांनी अनुभवाचे प्रमाणपत्र द्यावे. मानधनातील फरक थकीत मानधनासोबत देण्यात यावी. तसेच पंधरा वर्षे अखंड काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विनाअट शासकीय सेवेत सामावून घ्यावे, या मागण्या केलेल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज बसलेल्या उपोषणकर्त्यां मध्ये कांचन रामदासी, आशा भालेकर, बबलू जोडीवाले, वसीम शेख, कपिल जाधव, सविता हिवाळे, स्वाती वनिकर, रेहाना शेख, सीमा बेगम, सुनिता मुरजकर, वैशाली दंडे, सीमा अष्टीकर, भागीरथी उखाणे यांसह आदींचा समावेश होता.
हेही वाचा - मतदार नोंदणी दिन : जालन्यात जनजागृती रॅली आणि बक्षीस वितरण