बदनापूर (जालना) – अतिवृष्टीमुळे खरीपाचे प्रचंड नुकसान झाल्यानंतरही तालुक्यात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली. परंतु मागील चार ते पाच दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे व थंडीचे प्रमाण कमी झाल्याने रब्बी हंगामातील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान सोमवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यामुळे पिके संकटात सापडली आहेत.
अतिवृष्टीनंतर ढगाळ वातावरणाचा फटका
या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खरीपाचे म्हणावे तसे उत्पादन मिळालेले नाही. त्यातच मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाळी वातावरण तयार झाले असून, आता रब्बीच्या पिकांवरही ढगाळ वातावरणामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे. यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे तालुक्यात पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गहू आणि हरभऱ्याची लागवड केली आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
गहू व कांद्याच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता
तालुक्यात गहू व कांद्याचे क्षेत्र मोठे आहे. मात्र सुरुवातीपासूनच या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर अळी पडली आहे. तर गव्हाच्या पिकावर मावा रोग पडला आहे. तसेच कांद्यावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहे.