जालना : बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथे लंपी संसर्गजन्य आजारामुळे ( Due to Lumpy infectious disease ) ११ आंक्टोबर पर्यंत सोळा जनावरे दगावली असून, जिल्हा प्रशासनातील जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या गावाकडे पाठ फिरवली आहे. लंपीग्रसत जनावरांच्या मृत्यूमुळे काही अधिकारी, कर्मचा-यांजवळ भावना मांडण्याचा प्रयत्न केला. तर या भावनांना अरेरावीचे स्वरूप देऊन गटविकास अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकाने दीड महिन्यापासून रोषणगाव ग्रामपंचायतीवर बहिष्कार घातला. रोषणगाव जिल्हा व तालुका प्रशासनाच्या कार्यकक्षेत नसल्याची तक्रार गावातील तरूण शेतकरी कृष्णा एकनाथ खरात यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेल्या पत्राद्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सध्या २०१ जनावरे लंपी आजाराने बाधित गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात जनावरांच्या स्कीन संबंधित लंपी या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५० जनावरांचा या संसर्ग जन्य आजाराने मृत्यू झाला आहे. त्यातील सोळा जनावरे एकट्या रोषणगावातील असल्याचा दावा कृष्णा खरात यांनी ग्रामस्थांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या रक्ताच्या पत्राद्वारे केला आहे. गावात एकूण ७४९ जनावरे आहेत. सध्या २०१ जनावरे लंपी आजाराने बाधित आहेत. तर सोळा जनावरे दगावली आहेत. अशा स्थितीत गटविकास अधिकारी, ग्रामसेवक अशा जबाबदार अधिका-यांनी गेल्या दीड महिन्यांपासून गावावर कामकाजाचा बहिष्कार टाकला असून ही मंडळी गावाकडे फिरकेनासी झाली आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करून मायबाप सरकारने ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी कृष्णा खरातसह ग्रामस्थांनी केली आहे.