जालना - भोकरदन शहरासह तालुक्यात मृग नक्षत्राचा पाऊस झाल्याने शेतकरी खरिप हंगामातील पिकांची लागवड करण्यात व्यस्त झाला आहे. यावर्षी चांगला पाऊस होईल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून ठेवली होती.
मृग नक्षत्रात धो-धो पाऊस बरसेल आणि मृगाची पेर होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यातून व्यक्त होत असतानाच पाऊस वेळेवरच बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ पेरणीला सुरुवात केली. मृग नक्षत्रातील पेरणी ही चांगली व पोषक असते, असे शेतकऱ्यातून बोलले जाते. मागील तीन-चार दिवसांपासून शेतकऱ्यांनी प्रथम कपाशीची लागवड केली. तर आता मका, सोयाबीनसह इतर खरिप हंगामातील पिकांची लागवड करण्यात शेतकरी व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
सुरुवातीच्या पावसाने नदी नाल्यांना पाणी आल्याने पाणी पातळीत ही वाढ झालेली आहे. सुरुवात चांगली झाल्याने इतर नक्षत्रातही चांगला पाऊस होईल, या अपेक्षेने शेतकरी पेरणी उरकत आहेत.