जालना - जालन्यात ईडीचं पथक आज सकाळी दाखल झाले आहे. रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी ( Ramnagar Sugar Factory Purchase Case ) भाजपा नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर ( Former Minister Arjun Khotkar )यांच्यावर आरोप केल्यानंतर आज ईडीच्या पथकाने ( ED squads ) अर्जुन खोतकर सभापती असलेल्या जालना बाजार समितीच्या कार्यालयात ( Jalna APMC ) सर्वात प्रथम जाऊन चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. बाजार समितीत चौकशी केल्यानंतर या पथकाने बाजार समितीच्या सचिवांना सोबत घेऊन शहरातील जुना मोंढा भागात जात अर्जुन खोतकर कॉम्प्लेक्समधील कार्यालयावर धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर हे पथक पुन्हा जालना बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात दाखल झाले. बाजार समितीत या पथकाने काही कागदपत्रे तपासल्याची माहिती समोर आली आहे. या पथकातील अधिकाऱ्याची संख्या मात्र कळू शकली नाही.
तीन ठिकाणी धाडी -
बाजार समितीचे मुख्य कार्यालय आणि अर्जुन खोतकर यांचे बंधू संजय खोतकर यांच्या कार्यालयात छापेमारी करून चौकशी केल्यानंतर हे पथक जालन्यातील अर्जुन खोतकर यांच्या भाग्यनगर मधील निवासस्थानी पोहचले. आज सकाळी ईडीचे पथक शहरात दाखल झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम बाजार समितीचे मुख्य कार्यालय, त्यानंतर संजय खोतकर यांचे कार्यालय आणि खोतकर यांचे निवासस्थान अशा 3 ठिकाणी धाडी टाकून बाजार समिती आणि जालना साखर कारखाना खरेदी प्रकरणासंदर्भातील कागदपत्रे तपासणी करून खोतकर यांची चौकशी केली असल्याचीही माहिती पुढे आली आहे.
किरीट सोमय्यांची आरोप -
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी अर्जुन खोतकर यांच्यावर रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी आरोप करत अर्जुन खोतकर हेच कारखान्याचे मालक असल्याचा आरोप केला होता. यावर खोतकर यांनी मी या कारखान्याचा मालक नसून शेअर होल्डर असल्याचे स्पष्टीकरण दिलं. दरम्यान आज खोतकर यांच्याशी संबंधित संस्थांवर ईडीने छापेमारी केल्यानं जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.