जालना - अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जालना जिल्ह्यामध्ये 'ई- चलान' ही वाहनधारकांसाठी दंड भरण्याची नवीन पद्धत पोलीस प्रशासनात सुरू करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या हस्ते या सेवेला प्रारंभ झाला आहे. यावेळी पहिल्याच वाहनधारकाला दंड भरताना एसपी म्हणाले, 'टेन्शन नही लेनेका ई- चलान भरणे का'.
पोलीस प्रशासनाची शहर वाहतूक शाखा आणि वाहनधारक यांच्यामध्ये नेहमीच वाहतुकीचे नियम तोडण्यावरुन वाद उद्भवतात. यामध्ये कुठेतरी तडजोड करुन पावती फाडली जाते किंवा दोघांमध्ये एक पावती फाडली जाते, या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने 'ई चलान' ही नवीन पद्धत आजपासून (मंगळवार) सुरू केली आहे. यामुळे वाहनचालकांकडून दंड आकारण्यासाठी पोलिसांना सोपे झाले आहे.
रोख रक्कम असेल तरीही पावती मिळेल आणि नसेल तरीही पंधरा दिवसांमध्ये दंड भरण्याची व्यवस्था आहे. एखाद्या वाहनचालकाने नियम तोडल्यानंतर त्याला संबंधित चलनाची पावती देण्यात येईल. यामध्ये वाहनधारकाने रोख रक्कम भरली तरी चालेल, कार्ड पेमेंट केले तरीही चालेल आणि याही पुढे जाऊन जर दोन्ही नसेल तरीदेखील त्याला पावती मिळणारच आहे. ही पावती मिळाल्यानंतर संबंधित वाहनधारकाने पुढील पंधरा दिवसात महाराष्ट्रात कुठेही हे चलान तो भरू शकतो. त्याला मिळालेल्या पावतीवरील नंबर पोलिसांना सांगितल्यानंतर पोलीस हा दंड त्वरित भरून घेऊ शकतात. त्याहीपुढे जाऊन त्याने जर हे चलान भरले नाही तर न्यायालयाकडून त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही होऊ शकते. त्यासोबत हेच वाहन जर परत दुसऱ्या वेळी पकडले गेले तर पूर्वीचा शिल्लक असलेला दंड देखील या चलनाच्या मशीनमध्ये पहायला मिळणार आहे. त्याबरोबर बनावट नंबर प्लेटचा देखील तपास या मशीनमुळे लागणे सोपे झाले आहे. अनेक वाहनचालक दुचाकीची नंबर चारचाकीला आणि चारचाकीचा नंबर दुचाकीला वापरतात. परंतु या मशीनमध्ये संबंधित नंबर टाकल्यानंतर त्या वाहनाचा पूर्ण डाटा दिसणार आहे. त्यामुळे पोलिसांना चकवा देण्याचाही वाहनधारकांचा प्रयत्न फसणार आहे.
जालना जिल्ह्यासाठी सध्या दोन मशीन आले आहेत. लवकरच अजून चाळीस मशीन या सेवेत दाखल होणार आहेत. जालना शहरातील मामा चौकात आज या प्रक्रियेला पोलीस अधीक्षक चैतन्य यांच्या हस्ते सुरुवात झाली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक काकडे, सदर बाजारचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव आधी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
एकाच दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या तिघा जणांना पोलिसांनी पकडून पहिले ई चलान पोलीस अधीक्षकांच्या हस्ते ४०० रुपयांचे फाडण्यात आले आहे. उपक्रमाच्या सुरुवातीलाच ४०० रुपयांचे चलान फाडण्यात आल्यामुळे आणि पोलिसांच्या गराड्यात दुचाकीस्वार सापडल्यामुळे तो प्रचंड घाबरलेला दिसला. मात्र, चलान फाडल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी त्याला समजावून सांगत म्हणाले, 'टेन्शन नही लेनेका ई चलान भरणे का'.