जालना - शाळेचा नियमित अभ्यास करण्यासह स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी जिल्हा ग्रंथालयात येतात. मात्र, याठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनीच चोर ठरविल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हा ग्रंथालयात विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल वारंवार निवेदन दिले होते. मात्र त्याकडे लक्ष न दिल्याने आज या विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा ग्रंथालय समोर निदर्शने केली. त्यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांवर चोरीचे आरोप केले आहेत.
जिल्हा ग्रंथालयात अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, ग्रंथालय सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवावे, बंद असलेले पंखे दुरुस्ती करण्यात यावेत, शौचालयांची दुरुस्ती करावी, तसेच विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारे दैनिक, साप्ताहिक, मासिक, उपलब्ध करून देण्यात यावेत, ग्रंथालयात नोंदवही ठेवावी या आणि अन्य मागण्यांसाठी संदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दोन वेळा निवेदने दिली. मात्र, त्याचा काहीच परिणाम जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांवर झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या या विद्यार्थ्यांनी आज जिल्हा ग्रंथालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलनादरम्यान जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनी पुन्हा या विद्यार्थ्यांनाच चोर ठरवले आहे. ते पुस्तके कपाटात ठेवत नाहीत. तर घरी नेतात, असे बेताल वक्तव्य केल्यामुळे विद्यार्थी अजून संतप्त झाले. प्रत्यक्षात या ग्रंथालयात खालच्या आणि वरच्या मजल्यावर कोणत्याही कपाटात एकही पुस्तक सद्य परिस्थितीत नाही. त्यामुळे इथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी पुस्तके सोबत दैनंदिन पुस्तके देखील उपलब्ध होत नाहीत.
दरम्यान, याप्रकरणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी हजारे यांनी सांगितले की पंख्याच्या दुरुस्तीसाठी आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. तर विद्यार्थ्यांना चोर ठरवणाऱ्या या ग्रंथालय अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनामध्ये अमित आर्य ,विक्रम राऊत, किशोर मोरे, मारुती कल्याणकर, आकाश चाफाकानडे, वेदांत खैरे, साक्षी मुळे, पूजा खंडेकर आदी विद्यार्थी सहभागी झाले होते.