बदनापूर - कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे अनेकांचा रोजगार बंद झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अंत्योदय योजनेतून केंद्र सरकारने प्रती व्यक्ती 5 किलो तांदूळ दिलेला आहे. हा तांदूळ बदनापूरातील स्वस्त धान्य दुकानदारांनी आज वाटायला सुरूवात केली. यावेळी प्रचंड गर्दी उडाली. शेवटी महसूल आणि पोलीस पथकाने हस्तक्षेप करून गर्दी नियंत्रणात आणत सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना दिल्या.
तलाठी स्वतः या दुकानात थांबून गर्दी होऊ न देता हे वाटप करून घेताना दिसून आले. बदनापूरचे प्रभारी तहसीलदार संजय शिंदे यांनी शहरातील तांदूळ वाटप करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 1 येथे पाठवले. तलाठी यांच्या उपस्थितीत प्रती व्यक्ती 5 किलो तांदूळ वाटप सुरू करण्यात आले. प्रत्येक लाभार्थ्याला तांदूळ देताना बायामेट्रीक मशिनद्वारे निघणारी पावतीही देण्यात येत आहे. यामुळे, प्रती कार्ड किती तांदूळ देण्यात आला, याची माहितीही लाभार्थ्यांना मिळत आहे.
मोफत तांदूळ वाटप सुरू झाल्याची बातमी कळताच या दुकानात प्रचंड गर्दी झाली. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे दिसून येताच दुकान मालक व तलाठी यांनी तहसीलदार संजय शिंदे यांच्या कानावर ही बातमी घातली. त्यांनी याबाबत पोलिसांना कळवताच पोलीस निरीक्षक मारुती खेडकर हे आपल्या सहकाऱ्यासोबत या दुकानात गेले. याठिकाणी तांदूळ घेण्यासाठी मोठी गर्दी आढळून आल्यामुळे त्यांनी हे वाटप थांबवून लाभार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आवाहन केले. तसेच दुकान मालक व पोलीस कर्मचाऱ्यांनी दुकानासमोर तीन मीटर दूर दूर वर्तुळ आखून दिले.