जालना - ॲट्रॉसिटी प्रकरणात मदत करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांच्यासह अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज (गुरुवारी) दुपारी रंगेहाथ पकडले. या तिघांवरही जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात तक्रारदाराला मदत करण्यासाठी ही लाच स्वीकारण्यात आली. तक्रारदारावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्याकडे आहे. या गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी खिरडकर यांनी पाच लाख रुपयांची मागणी संबंधित आरोपीकडे केली होती. मात्र तडजोडीअंती तीन लाख देण्याचे ठरले. त्यानंतर कदीम जालना पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक संतोष निरंजन अंभोरे आणि विठ्ठल पुंजाराम खारडे या दोघांना खिरडकर यांनी हाताशी धरले. यातील संतोष अंभोरे याने आज दोन लाख रुपयांची आरोपीकडून लाच स्वीकारली. यावेळी पुणे लाचलूचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वर्षाराणी पाटील, पोलीस निरीक्षक सुनील शिरसागर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.