जालना - शहरासह जिल्ह्यामध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, शासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर होणार्या संभाव्य कारवाईला फाटा मारण्यासाठी ही आकडेवारी लपवत आहेत. शासन दरबारी अशा रुग्णांची शहरी भागात 25 तर ग्रामीण भागात २४ अशी अधिकृत आकडेवारी आहे. प्रत्यक्षात मात्र जालना शहरातील एका -एका रुग्णालयात डेंग्यूची लक्षणे असलेले ५०-५० रुग्ण उपचार घेत आहेत.
किटकजन्य आजारांपासून होणाऱ्या साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवणाऱ्या जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीने जानेवारी 2019 पासून 18 नोव्हेंबर 2019 पर्यंत 142 रुग्ण तपासण्यात आले होते. त्यापैकी 49 रुग्णांना डेंग्यूचा आजार असल्याचे निष्पन्न झाले. यात ग्रामीण भागातील 24 तर शहरी भागातील 25 रुग्णांचा समावेश आहे. यामध्येही १९ रुग्ण हे फक्त जालना शहरातील आहेत.
हेही वाचा - भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील ब्रिटिश कालीन पूल अखेर कोसळला
जालना शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. त्यातच वर्षभरापूर्वी शहरात सिमेंट आणि डांबराचे रस्ते करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कारणाने हे रस्ते मध्यभागातून फोडण्यात येत आहेत. पण सदर काम पूर्ण झाल्यानंतर त्याची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे चांगल्या रस्त्यात खड्डे पडून त्यात पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे डासांचेही प्रमाण वाढले आहे. यासाठी नगरपालिकेकडे फक्त एक फॉगिंग मशीन असून ती पूर्ण जालना नियंत्रण करू शकत नाही.
हेही वाचा - एलजीबी कंपनीच्या कामगारांचे उपोषण सुरूच
शहरात उघड्या नाल्या आणि कचऱ्यांचे ढीग साचल्यामुळे देखील डेंग्यूचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात मंगळवारी नगरपालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल आणि मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांना धारेवर धरले होते. मात्र, वरातीमागून घोड्याप्रमाणे आता फॉगिंग मशीन खरेदी केल्या जातील असे म्हणत, मुख्याधिकार्यांनी वेळ मारून नेली.
हिवताप अधिकाऱ्यांच्या पत्राकडे नपचे दुर्लक्ष
जालन्यात डेंग्यू सदृश्य रुग्णांच्या संख्येतील वाढ लक्षात घेता जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी 26 ऑगस्ट 2019 रोजी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. एवढेच नव्हे तर खडकतलाव भागात डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाच्या नावासह नगरपालिकेला माहिती दिली होती. मात्र, नगरपालिकेने ही बाब गंभीर घेतलीच नाही, आणि आज जालन्यात सर्वत्र डेंग्यूने थैमान घातले आहे.
उपचार एकच मात्र तपासणी फरक
डेंग्यूच्या रुग्णात आढळलेली लक्षणे पाहता शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालय एकच उपचार पद्धती अवलंबित आहे. मात्र, ही लक्षणे तपासण्याच्या दोघांच्याही पद्धती वेगळ्या आहेत. त्यामुळे खरा आकडा शासकीय यंत्रनेबाहेर येऊच देत नाही. खाजगी रुग्णालयात आरडीके (रॅपिड डायग्नोस्टिक किट) च्या माध्यमातून रुग्णांच्या रक्ताची तपासणी करून डेंग्यूची लक्षणे आढळल्यास त्यावर त्वरित उपचार सुरू केले जातात. मात्र, ही लक्षणे डेंग्यूची आहेत का हे मान्य करण्यास सरकारी यंत्रणा तयार नाही. त्यांच्या यंत्रणेनुसार एलायझर ही तपासणी केल्याशिवाय रुग्ण डेंग्यूचा आहे हे घोषित केल्या जात नाही. ही तपासणी करण्यासाठी खाजगी रुग्णालयांनी शासकीय यंत्रणेला कळविल्यानंतर या रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले जातात. तेथून अहवाल आल्यानंतरच या रुग्णांची डेंग्यूचा रुग्ण म्हणून नोंद केल्या जाते आणि पुढील काळजी घेतली जाते.
खाजगी रुग्णालयात येणारे 67 टक्के रुग्ण हे डेंग्यूची लक्षण असलेले येत असल्याची माहिती एका खासगी डॉक्टरांनी दिली. तसेच सरकारी रुग्णालयात देखील रोज ३-४ रुग्णांची हे असे लक्षण असलेली भरती होत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये 20 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
हेही वाचा - जालन्यात महिलेच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक