जालना - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची मंगळवार दिनांक २८ मे रोजी जयंती आहे. या जयंतीनिमित्त नव्या जालन्यात असलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अर्धकृती पुतळा बदलून पूर्णाकृती पुतळा बसवावा तसेच पुतळ्याभोवती सुशोभीकरण करून विद्युतीकरणाची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी सावरकर प्रेमींनी केली आहे.
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्थापन करण्यात आलेल्या सावरकर जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज जालना नगरपालिकेच्या अध्यक्षा संगीता गोरंट्याल यांची भेट घेतली आणि आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, सावरकर चौकामध्ये सावरकरांचा अर्धकृती पुतळा आहे. मात्र, त्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्यामुळे या पुतळ्याची उंची कमी झाली आहे. तसेच पुतळ्याभोवती असलेली जागा हातगाडी आणि वाहनांनी वेढल्यामुळे या पुतळ्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथे आता सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, तसेच परिसरातील जागा राखीव ठेवून तिथे सुशोभीकरण करावे आणि कायमस्वरूपी प्रकाशाची व्यवस्था करावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
२८ तारखेला असलेल्या वि. दा .सावरकर यांच्या जयंती पूर्वी किमान विद्युतीकरण आणि सुशोभीकरण पूर्ण करावे, अन्यथा दिनांक २६ मे रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा या समितीच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदन देताना सावरकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष जगदीश गोड, उपाध्यक्ष प्रसाद पाटील, कोषाध्यक्ष अॅड. विनोद कुलकर्णी, कार्याध्यक्ष आनंद मुळे, रवींद्र देशपांडे, दीपक रणनवरे, आदींची यावेळी उपस्थिती होती.